‘तिच्या’ आक्रमकतेने सारेच हतबल

By Admin | Updated: November 15, 2015 02:06 IST2015-11-15T02:06:49+5:302015-11-15T02:06:49+5:30

वृद्धत्वामुळे ‘त्यांचे’ कुबडे निघाले आहे. थरथरत्या पायावर वाकड्या शरीराचा भार कसाबसा पेलत ते काही क्षण उभे राहतात.

Her 'aggressive' aggression has all the power | ‘तिच्या’ आक्रमकतेने सारेच हतबल

‘तिच्या’ आक्रमकतेने सारेच हतबल

वृद्ध सासऱ्यावर अतिप्रसंगाचा आरोप : पोलिसांचाही उद्धार
नरेश डोंगरे नागपूर
वृद्धत्वामुळे ‘त्यांचे’ कुबडे निघाले आहे. थरथरत्या पायावर वाकड्या शरीराचा भार कसाबसा पेलत ते काही क्षण उभे राहतात. जास्त बोलूही शकत नाही. धाप लागत असल्याने ते जे बोलतात, समोरच्याला त्यातील काही कळते अन् काही कळतही नाही. अशा या ७५ ते ८० वर्षांच्या ‘बावाजी’वर त्यांची सून गंभीर आरोप लावत आहे. त्यांच्या सूनेच्या कथनानुसार, हे बावाजी तिच्यावर नेहमी बलात्काराचा प्रयत्न करतात. स्वत:शी लग्न करावे म्हणून, तिच्यावर वेगवेगळ्या प्रकारे दडपण आणतात. विशेष म्हणजे, नवरा (बावाजीचा मुलगा) आपल्या वडिलांनाच साथ देतो अन् पोलीसही त्यांची पाठराखण करतात. त्याचमुळे ती सासरा, नवरा यांच्यावर कारवाई करून घेण्यासाठी आक्रमक भूमिका वठवून पोलिसांचाही उद्धार करते आहे. अफलातून ठरावे असे हे प्रकरण अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे.
महिला-मुलींवरील वाढत्या अत्याचाराने देशभरात चिंता व्यक्त केली जात आहे. निर्भया प्रकरणानंतर महिला अत्याचारविरोधी कायदे अधिकच कडक करण्यात आले. अत्याचारी, गुन्हेगारांवर वचक बसवण्याच्या हेतूने हे कडक कायदे अमलात आणले जात आहेत. महिलांच्या तक्रारींची तातडीने दखल घेत संबंधितांवर पोलीस गुन्हे दाखल करतात.
त्याला अटक करताना अनेक प्रकरणात साधी शहानिशाही होत नसल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. एमआयडीसी, अंबाझरीसह विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी घडलेल्या बलात्कारांच्या प्रकरणात उघड झालेली धक्कादायक माहिती ‘संबंधित’ व्यक्तींसोबत त्याच्या कुटुंबीयांवरही अन्याय करणारी असल्याचे उघड झालेले आहे. या प्रकरणातील महिलांनी कायद्याचा कसा दुरुपयोग करून घेतला, तेसुद्धा उघड झाले आहे. कायद्याची अशीच वाट लावणारे एक प्रकरण अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उजेडात आले आहे. या प्रकरणाची धग केवळ संबंधित कुटुंबीयांनाच नव्हे तर आजूबाजूची मंडळी अन् पोलिसांनाही अस्वस्थ करीत आहे.
प्रकरणातील तक्रारकर्ती महिला साधारणत: ४० ते ४५ वर्षांची आहे. १० वर्षांपूर्वी तिचे लग्न झालेले. घरी सारे काही व्यवस्थित असताना काय झाले कळायला मार्ग नाही. गेल्या तीन चार वर्षांपासून तिच्या घरातील कलह वाढला. नवरा पक्क्या रोजगारात नाही. त्यात मितभाषी अन् शांत स्वभावाचा. दिवसभर कामासाठी फिरणारा. इकडे घरात ‘तिसऱ्याची’ उठबस वाढली. त्यातून वाद वाढला. संवेदनशिल वेळ मारून नेण्याऐवजी ती आक्रमक झाली. त्यामुळे घरातील वादाने भांडणाचे रूप घेतले. आदळआपट आजूबाजूच्यांच्या चर्चेचा नव्हे तर हस्तक्षेपाचाही विषय ठरली.
निवृत्तीचे जीवन जगणाऱ्या बावाजींना मुलगा आणि सूनेतील विसंवादाने रडकुंडीला आणले. त्यामुळे त्यांनी दोघांना शांत करण्याचे प्रयत्न केले. मात्र, झाले उलटेच. सून त्यांच्यावरच उलटली. नवऱ्याच्या अनुपस्थितील ‘हालचालीची’ माहिती देऊन तुम्हीच नवऱ्याला भडकावता, माझ्यावर पाप लावता, असा आरोप करू लागली. इथपर्यंत समजण्यासारखे होते. मात्र, तिने कळस गाठला. नवऱ्याशी दोन हात करतानाच ती पित्यासमान सासऱ्यावरही हात उचलू लागली. त्यांना मारहाण करतानाच ती पोलिसांकडेही तक्रारी करते. तिच्या तक्रारीनुसार, आपल्याशी लग्न करावे म्हणून वृद्ध सासरा तिचा छळ करतो. संपत्तीचे आमिष दाखवतो. बलात्काराचा प्रयत्न करतो. नवऱ्याकडे सासऱ्याची तक्रार केली असता तो लक्ष देत नाही. त्यामुळे घरात कटकटी होतात. वाद, मारहाण नेहमीचाच प्रकार झाला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून पोलिसांकडे तक्रारी करूनही पोलीस लक्ष देत नाहीत. त्यामुळे आता मी काय करावे, असा ती प्रश्न विचारते. पोलीस ठाण्यातून दाद मिळत नसल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी करते. (प्रतिनिधी)

पोलिसही दहशतीत

वरिष्ठ अधिकारी त्याची दखल घेत संबंधित पोलिसांना विचारणा करून कडक कारवाईचे निर्देश देतात. या प्रकरणाची ‘दुसरी बाजू’ माहीत असल्यामुळे अजनी ठाण्यातील पोलीस वरिष्ठांना प्रकरणाची माहिती देऊन काय कारवाई करावी, असा उलटप्रश्न विचारतात. ज्यांना धड उभेही राहता येत नाही ते धडधाकट सुनेवर बलात्काराचा प्रयत्न कसा करू शकतात, असेही विचारतात. पोलिसांची ही भूमिका तिला दुखावणारी ठरली आहे. त्यामुळे ती अधिकच आक्रमक झाली आहे. ती पोलीस ठाण्यात चक्क ठाणेदारावरही पक्षपात अन् अन्यायाचा आरोप लावते. कायदा महिलांच्या बाजूने, त्यात ती कोणताही आरोप लावू शकते. उद्या तिने उलटसुलट आरोप केल्यास आपलीच नोकरी धोक्यात येऊ शकते, याची कल्पना असल्यामुळे अनेक पोलीस तिच्या समोर जायचे टाळतात. शक्यतो ठाण्यातील सीसीटीव्ही समोरच तिच्याशी संभाषण करतात. एरव्ही, कुणी साधा कायदा समजावून सांगण्याचा प्रयत्न केल्यास पोलीस त्याची ऐसीतैसी करून त्याला ‘सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याच्या’ आरोपाखाली कोठडीत डांबतात. या प्रकरणातील महिलेने मात्र कायद्याचा गैरफायदा घेऊन ‘कायद्याच्या रक्षकांनाही’ दहशतीत आणले आहे.

‘तिच्या’वर कडक कारवाई व्हावी
या प्रकरणाची चर्चा काही महिला नेत्यांच्या कानावरही गेली आहे. महिलांवरील अन्याय-अत्याचाराच्या विरोधात नेहमी आवाज उचलणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या नूतनताई रेवतकर यांच्याशी या अनुषंगाने चर्चा केली असता, ‘काही महिला कायद्याचा दुरुपयोग करतात, असे अनेक प्रकरणातून उघड झाले आहे. या प्रकरणातील आणि कायद्याचा दुरुपयोग करणाऱ्या दोषी महिलांवर कडक कारवाई व्हायला पाहिजे’, असे रेवतकर म्हणाल्या.

Web Title: Her 'aggressive' aggression has all the power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.