हिपॅटायटिस सी ग्रस्ताचे मूत्रपिंड प्रत्यारोपण

By Admin | Updated: November 18, 2016 03:05 IST2016-11-18T03:05:24+5:302016-11-18T03:05:24+5:30

एकेकाळी क्षयरोग असलेल्या व ‘हिपॅटायटिस सी’ विषाणूची लागण झालेल्या रुग्णाचे गरजूला यशस्वी मूत्रपिंड

Hepatitis C gastake kidney transplant | हिपॅटायटिस सी ग्रस्ताचे मूत्रपिंड प्रत्यारोपण

हिपॅटायटिस सी ग्रस्ताचे मूत्रपिंड प्रत्यारोपण

‘सुपर’मध्ये सातवे प्रत्यारोपण यशस्वी : डॉक्टरांनी धोका पत्करून केली शस्त्रक्रिया
नागपूर : एकेकाळी क्षयरोग असलेल्या व ‘हिपॅटायटिस सी’ विषाणूची लागण झालेल्या रुग्णाचे गरजूला यशस्वी मूत्रपिंड (किडनी) प्रत्यारोपण करण्याचा मानही सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला मिळाला आहे. मूत्रपिंड प्रत्यारोपणातही आता अधिक गुंंतागुंतीची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होऊ घातल्याने डायलिसिसवर जगणाऱ्या रुग्णांसाठी हे हॉस्पिटल वरदान ठरत आहे. गेल्या आठ महिन्यांत मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या सात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या असून, हे हॉस्पिटल आता खऱ्या अर्थाने ‘सुपर’ झाल्याचे बोलले जात आहे.
उकंडराव खुरसंगे (वय ४५) असे मूत्रपिंड प्रत्यारोपण झालेल्या रुग्णाचे नाव. उकंडराव यांना आई शांताबाई (वय ७०) यांनी आपले मूत्रपिंड दान केले.
शांताबाई यांना यापूर्वी क्षयरोगाचा आजार आणि आता हिपॅटायटिस सी याची लागण झाल्याचे निदान झाले होते. हिपॅटायटिस सी हा जंतूसंसर्ग आजार आहे. याचे विषाणू, रक्त, दूषित सुयांचा पुनर्वापर, बाधित रुग्णाचे शारीरिक द्रव पदार्थ - जसे लाळ, वीर्य, योनिद्रव, मणक्यातील पाणी, पोटातील पाण्याच्या संपर्कातून, रुग्णाचे दाढीची ब्लेड किंवा टुथब्रश शेअर केल्यानेसुद्धा हे विषाणू निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करू शकतात. त्यामुळे हा संसर्ग झाल्यानंतर रुग्णाचे अवयव निकामी होण्याचा धोका असतो. अशापरिस्थितीत हिपॅटायटिस सी ग्रस्ताचे मूत्रपिंड प्रत्यारोपण करताना जोखीम दुपटीने वाढते. त्यासाठी अत्यंत बारकाईने काळजी घ्यावी लागते. वैद्यकीय परिभाषेत याला ‘अ‍ॅँटी एचव्हीसी’ अथवा ‘डायरेक्टली अ‍ॅक्टिंग अ‍ॅँटी व्हायरस’ (डीएए) म्हणतात. पूर्वी असे मूत्रपिंड प्रत्यारोपण करताना लाखोंच्या इंजक्शनचा वापर केला जायचा. मात्र अद्ययावत उपचार तंत्रामुळे गोळ्यांद्वारेदेखील या विषाणूंना आवर घालता येतो. अशाच एका हिपॅटायटिस ग्रस्ताच्या मूत्रपिंडाचे गुरुवारी यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी डॉ. संजय कोलते, डॉ. चारुलता बावनकुळे, डॉ. धनंजय सेलूकर, डॉ. मनीष बलवानी यांच्या नेतृत्वाखाली अधिपरिचारिका शैलजा, इंदू कांबळे, एन. महाकाळकर, हिरा नान्हे, सुरेखा बोंबाडकर, करुणा बागडे, प्रतिभा राऊत, आरती देशमुख, नेहा फुलमाळी, श्वेता वानखेडे, पल्लवी सावरकर, सुवर्णा रेवतकर, परिचर विनोद खोडे, नीलेश चौधरी, दर्शन कोल्हे, गीतेश वासेकर, मोदराज नंदेश्वर यांच्या चमूने मोलाचे योगदान दिले.(प्रतिनिधी)

शस्त्रक्रियेच्या वेळी डॉक्टरांनाही धोका असतो
हिपॅटायटिस सी असलेल्या रुग्णावर कुठलीही शस्त्रक्रिया करीत असताना थोडी जरी चूक झाल्यास व काळजी न घेतल्यास डॉक्टरालाही या रोगाचा धोका होऊ शकतो. गुरुवारी झालेली शस्त्रक्रिया गुंतागुंतीची असली तरी ती यशस्वी झाली आहे.
-डॉ. संजय कोलते, किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ

आज आणखी एक प्रत्यारोपण
सुपरने आतापर्यंत मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या सात शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत. शुक्रवारी आणखी एका मूत्रपिंड विकारग्रस्तावर अवयव प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया होणार आहे. तर पुढच्या काही दिवसांत मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या आणखी दोन शस्त्रक्रिया होणार आहेत.

Web Title: Hepatitis C gastake kidney transplant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.