‘अलिना’च्या हेमलताला सात दिवसांची पोलीस कोठडी

By Admin | Updated: December 6, 2015 03:11 IST2015-12-06T03:11:05+5:302015-12-06T03:11:05+5:30

हुडकेश्वर भागातील आम्रपालीनगर येथे ‘ अलिना एम्प्लॉयमेन्ट रिसोर्सेस’ या नावाने गोरखधंदा उघडून मूळ गुंतवणुकीवर दर दोन महिन्यात..

Hemlata's seven-day police custody | ‘अलिना’च्या हेमलताला सात दिवसांची पोलीस कोठडी

‘अलिना’च्या हेमलताला सात दिवसांची पोलीस कोठडी

गुंतवणूक, आकर्षक व्याज आणि घरबसल्या रोजगाराचे आमिष
नागपूर : हुडकेश्वर भागातील आम्रपालीनगर येथे ‘ अलिना एम्प्लॉयमेन्ट रिसोर्सेस’ या नावाने गोरखधंदा उघडून मूळ गुंतवणुकीवर दर दोन महिन्यात दहा टक्के व्याज आणि घरबसल्या रोजगाराचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांना लाखो रुपयांनी लुबाडल्याप्रकरणी एका महिलेला आर्थिक गुन्हे पथकाने शनिवारी एमपीआयडी कायद्याच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयात हजर करून तिचा १२ डिसेंबरपर्यंत सात दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केला.
हेमलता राकेश चिरकुटे (३५), असे आरोपी महिलेचे नाव आहे. या महिलेविरुद्ध रामेश्वरी पार्वतीनगर येथील प्रियंका उमेश काळे आणि इतर आठ जणांनी तक्रार नोंदवल्याने हुडकेश्वर पोलिसांनी भादंविच्या ४२० आणि महाराष्ट्र गुंतवणूकदार हितसंबंध संरक्षण कायदा (एमपीआयडी) च्या कलम ३ अन्वये गुन्हा दाखल केला होता. या महिलेने काळे आणि इतर आठ जणांची ७ लाख ५९ हजार ६५१ रुपयांनी फसवणूक केलेली आहे. प्रत्येक गुंतवणूकदाराने ७५०० रुपयांची गुंतवणूक केल्यास आरोपी हेमलता ही संबंधित गुंतवणूकदार महिलेला दर दोन महिन्यानंतर १० टक्के व्याज देत होती. तसेच चार हजार रुपये महिना या प्रमाणे घरबसल्या रोजगारही उपलब्ध करून देत होती. त्यामुळे फसवणूक झालेल्यांमध्ये महिलांचाच अधिक समावेश आहे. काही दिवस नियमित व्याज आणि पगार दिल्यानंतर तिने अचानक आपली ही दुकानदारी बंद केली होती. त्यामुळे गुंतवणूकदारांनी मोठा उद्रेक करून तिच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. या महिलेला काल हुडकेश्वर पोलिसांनी अटक केली होती. परंतु प्रकरण आर्थिक गुन्ह्याशी संबंधित असल्याने काल रात्रीच गुन्हे शाखेच्या आर्थिक गुन्हे पथकाने आरोपीला आणि संबंधित गुन्ह्याची कागदपत्रे आपल्या ताब्यात घेतली. पोलीस निरीक्षक मदतने यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास सोपवण्यात आला. आरोपी महिलेने सुमारे १० हजार गुंतवणूकदारांची फसवणूक केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सरकार पक्षाने आरोपीच्या दहा दिवसांच्या पोलीस कोठडी रिमांडची मागणी केली होती. बचाव पक्षाने पोलीस कोठडी रिमांडला विरोध केला होता. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून प्रकरण गंभीर असल्याने १२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी रिमांड सुनावला. न्यायालयात सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील कल्पना पांडे तर आरोपीच्यावतीने अ‍ॅड. प्रदीप वाठोरे आणि अ‍ॅड. संदीप नंदेश्वर यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)

तोडफोड प्रकरणात गुन्हे दाखल
हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये हडप करणाऱ्या अलीना एम्प्लॉयमेंट रिसोर्सेसची आरोपी संचालिका हेमलता राकेश चिरकुटे हिला ताब्यात देण्याची मागणी करून तोडफोड करणाऱ्या जमावावर हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. हेमलता चिरकुटेने सर्वसामान्य कुटुंबातील महिला, तरुणींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्या परिश्रमाची रक्कम गुंतवणूकीच्या नावाखाली गिळंकृत केली. तिची बनवाबनवी उघड झाल्यामुळे पीडित गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली. त्यांनी चिरकुटेच्या कार्यालयाची शुक्रवारी दुपारी तोडफोड केली. पोलिसांची वाहनेही फोडली आणि पोलीस ठाण्याला घेराव घालत दगडफेकही केली. त्यात प्रकाश लुंगे नामक पोलीस कर्मचारी जखमी झाला. त्यामुळे हुडकेश्वर पोलिसांनी संतप्त जमावातील रूपा सुमित आष्टनकर, गीता मधुकर गोडबोले, रिना प्रकाश लोखंडे, प्रणाली दत्तात्रय पांडे, मनोज भोला सांगोडे, अस्मिता मनोज हत्तीमारे, दीपाली दिनेश पौनीकर, दिनेश सुरेश पौनीकर आणि अभिलाषा मनोज सांगोडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

 

Web Title: Hemlata's seven-day police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.