पाण्याच्या टाक्या साफसफाईत हयगय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:12 IST2021-03-04T04:12:07+5:302021-03-04T04:12:07+5:30
कैलास निघाेट लाेकमत न्यूज नेटवर्क देवलापार : गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाक्यांची नियमित साफसफाई करणे क्रमप्राप्त आहे. देवलापार (ता. ...

पाण्याच्या टाक्या साफसफाईत हयगय
कैलास निघाेट
लाेकमत न्यूज नेटवर्क
देवलापार : गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाक्यांची नियमित साफसफाई करणे क्रमप्राप्त आहे. देवलापार (ता. रामटेक) येथील पाण्याच्या टाकीच्या काॅलमवर टाकी साफ केल्याच्या तारखा नमूद केल्या आहेत. या फलकाचा आधार घेतला तर ३० ऑगस्ट २०२० पासून अर्थात सहा महिन्यापासून पाण्याच्या टाक्यांची साफसफाई केली नसल्याचे स्पष्ट हाेते. साफसफाई न केलेल्या टाक्यांमधील पाणी प्यायल्याने नागरिकांना पाण्यापासून उद्भवणारे आजार हाेण्याची शक्यता बळावल्याने त्यांच्या आराेग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
देवलापार हे रामटेक तालुक्यातील माेठ्या व महत्त्वाच्या गावांपैकी एक गाव आहे. साडेपाच हजार लाेकसंख्येच्या या गावाला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाची असून, त्यासाठी गावात दाेन टाक्यांची निर्मिती करण्यात आली आहे. यातील पहिली टाकी झिंझेरिया राेडलगतच्या माेतीराम खंडाते यांच्या घरालगत असून, दुसरी टाकी गावातील हिना काॅलनीत आहे. या दाेन्ही टाक्यांमधून संपूर्ण गावाला नियमित पाणीपुरवठा केला जाताे.
या दाेन्ही टाक्यांची नियमित साफसफाई करण्याची जबाबदारीदेखील ग्रामपंचायत प्रशासनाची आहे. या टाकीच्या एका काॅलमवर टाकी साफ केल्याच्या तारखा नमूद केल्या आहेत. या टाक्या दर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात साफ केल्याचे या फलकावरून स्पष्ट हाेते. या टाक्यांची ३० ऑगस्ट २०२० पासून साफसफाई करण्यात आली नाही, अशी माहिती काही जाणकार व्यक्तींनी दिली असून, तसा स्पष्ट उल्लेखही या फलकावर केला आहे.
या टाक्यांची पंधरवड्यातून किमान एकदा साफसफाई करणे आवश्यक असल्याची माहिती नागरिकांनी दिली असून, त्याला वैद्यकीय सूत्रांनी दुजाेरा दिला आहे. मात्र, देवलापार येथील टाक्यांची साफसफाई महिन्यातून एकदा केली जात असून, ती सहा महिन्यापासून करण्यात आली नाही. या प्रकाराला ग्रामविकास अधिकारी जबाबदार असल्याचा आराेप नागरिकांनी केला आहे. काेराेना संक्रमण काळात साफसफाईकडे दुर्लक्ष करून आराेग्याशी खेळणे गंभीर बाब असल्याचेही नागरिकांनी सांगितले.
...
विहिरीतील पाण्याचा पुरवठा
महाजन टाेला (देवलापार) येथे खाेदलेल्या विहिरीतून देवलापारला पाणीपुरवठा केला जाताे. त्यासाठी दाेन किमीची पाईपलाईन दाेन्ही टाक्यांपर्यंत टाकण्यात आली आहे. या विहिरीतील पाणी न गाळता अथवा शुद्ध न करता टाक्यांमध्ये चढविले जाते आणि तेच पाणी नळाद्वारे नागरिकांच्या घरांमध्ये पाेहाेचविले जाते. या टाक्या उंच असून, त्यांचे झाकण व्यवस्थित आहे की नाही, याची नागरिकांना माहिती नसते. कचरा, पक्ष्यांची विष्ठा व अन्य बाबी टाकीत पडून त्या पाण्यात मिसळत असल्याने तसेच आत शेवाळ वाढत असल्याने त्या टाक्यांची नियमित साफसफाई करणे गरजेचे आहे.
...
सरपंचाचा मनमानी कारभार
देवलापार येथील सरपंचाची मनमानी वाढल्याने त्यांच्यावर शेवटी अविश्वास प्रस्ताव आणला हाेता. हा प्रस्ताव पारित झाल्याने सरपंचाला पायउतार व्हावे लागले. त्यामुळे या ग्रामपंचायतवर वर्षभरापासून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली हाेती. प्रशासक गावात येत नसल्याने कर्मचाऱ्यांना रान माेकळे झाले. विचारणा हाेत नसल्याने ग्रामविकास अधिकाऱ्यासह इतर कर्मचाऱ्यांनीही मूलभूत व महत्त्वाच्या कामात हयगय करायला सुरुवात केली. या ग्रामपंचायतला नव्यानेच पदाधिकारी व ग्रामपंचायत सदस्य लाभले आहेत. त्यांनी हा जिव्हाळ्याचा विषय गांभीर्याने घ्यावा, अशी अपेक्षाही स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.