‘हेल्मेट’ची मोहीम एकाच दिवसाकरिता?
By Admin | Updated: February 11, 2016 03:23 IST2016-02-11T03:23:45+5:302016-02-11T03:23:45+5:30
हेल्मेट’नंतर मंगळवारी ‘सीटबेल्ट’संदर्भात कारवाई करण्यात आली व बुधवारी तर या दोघांऐवजी चक्क ‘फॅन्सी नंबर प्लेट’ तसेच ...

‘हेल्मेट’ची मोहीम एकाच दिवसाकरिता?
तिसऱ्या दिवशी ‘फॅन्सी नंबर प्लेट’वर कारवाई : ‘सीटबेल्ट’, ‘हेल्मेट’साठी कारवाई नाही
नागपूर :‘हेल्मेट’नंतर मंगळवारी ‘सीटबेल्ट’संदर्भात कारवाई करण्यात आली व बुधवारी तर या दोघांऐवजी चक्क ‘फॅन्सी नंबर प्लेट’ तसेच वाहन चालविताना मोबाईलवर बोलणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. हेल्मेट’ न घालणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले असले तरी प्रत्यक्षात याची अंमलबजावणी केवळ एकच दिवस होऊ शकली. पोलिसांनी ‘हेल्मेट’ तसेच ‘सीटबेल्ट’ न लावणाऱ्यांविरुद्ध एकच दिवस मोहीम चालवली असली तरी यामुळे शहरात बरीच जागृती झाली आहे. त्यामुळे नियमांचे पालन व्हावे यासाठी ही मोहीम सुरू राहण्याची आवश्यकता आहे.
‘हेल्मेट’ तसेच ‘सीटबेल्ट’संदर्भातील कारवाईची मोहीम सुरू झाली व शहरात नागरिकांच्या तोंडी हाच विषय होता. ‘सोशल मीडिया’वरदेखील यासंदर्भात जोरदार चर्चा सुरू आहे. ‘हेल्मेट’ व ‘सीटबेल्ट’संदर्भात नागरिकांमध्ये जागृती येण्यासाठी एकच दिवस पुरेसा आहे का, याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. जर ही मोहीम थंडावली तर परत ‘जैसे थे’ स्थिती व्हायला वेळ लागणार नाही.बुधवारी शहरातील विविध मार्गांवर गाडी चालविताना मोबाईलवर बोलणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात आली. सोबतच ‘फॅन्सी नंबर प्लेट’ लावणाऱ्या वाहनचालकांवर केंद्रीय मोटर वाहन कायदा ५१ तसेच सिग्नल तोडणाऱ्यांविरुद्ध कलम ११९ अंतर्गत कारवाई करण्यात आली. परंतु पहिल्या दोन दिवसांसारखा या कारवाईत जोर नव्हता.
तिसऱ्या दिवशी ज्या प्रकरणात कारवाई करण्यात आली त्यानुसार शहरात ‘फॅन्सी नंबर प्लेट’ लावण्याचा प्रकार वाढला आहे. याला आळा घालण्याची गरज आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान बड्या व्यक्तींच्या वाहनावर अशाच प्रकारच्या फॅन्सी नंबर प्लेट लावण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. सुरक्षेच्या दृष्टीने अशा नंबर प्लेट धोकादायक आहेत. सिग्नल तोडणे, मोबाईलवर संभाषण करताना वाहन चालविणे जीवघेणे ठरू शकते. वाहतूक पोलिसांच्या सुरक्षा मोहिमेसोबतच वाहतूक नियमांचे पालन करण्यावर अधिक भर दिला जाणार आहे. (प्रतिनिधी)
अवैध प्रवासी वाहतुकीकडे दुर्लक्ष
शहराच्या विविध भागातील मार्गावरून अवैध प्रवासी वाहतूक खुलेआम सुरू आहे. यावर कुठलाही आळा घातला जात नाही. भंडारा रोड, वर्धा रोड, कामठी, सावनेर, अमरावती, काटोल, उमरेड मार्गावर ही वाहतूक सुरू आहे. पोलिसांसोबत संगनमत असल्याने ही वाहतूक सुरू आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. कोणत्याही स्वरूपाच्या नियमांचे पालन होताना दिसत नाही. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
आणखी आहेत मुद्दे
‘हेल्मेट’ व ‘सीटबेल्ट’वरील कारवाईनंतर इतर आणखी मुद्यांवरदेखील कारवाई करण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी आहे. यात वाहनांमध्ये ‘रेट्रो रिफ्लेक्टिव्ह टेप’, टेल लाईट’, क्षमतेहून अधिक वजनाची मालवाहतूक करणे, या मुद्यांचा समावेश आहे. यासंदर्भातदेखील कारवाई झाली पाहिजे.
हेल्मेटसक्ती नसल्याचा मेसेज अफवा
मोहिमेदरम्यान मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांना सामील करण्यात येणार आहे. प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या नियमांतर्गत कारवाई केली जाणार आहे. सोशल मीडिवारील शहरात हेल्मेटसक्ती नसल्याची मेसेज अफवा आहे.
-भारत तांगडे , उपायुक्त (शहर वाहतूक पोलीस)