कोराडी महोत्सवादरम्यान ‘हेलिकॉप्टर शो’

By Admin | Updated: September 2, 2016 02:51 IST2016-09-02T02:51:14+5:302016-09-02T02:51:14+5:30

यंदाच्या श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी नवरात्रोत्सवादरम्यान कोराडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

'Helicopter show' during the Koriadi Mahotsav | कोराडी महोत्सवादरम्यान ‘हेलिकॉप्टर शो’

कोराडी महोत्सवादरम्यान ‘हेलिकॉप्टर शो’

देशभरात पोहोचणार कोराडीतील नवरात्रोत्सव : पालकमंत्र्यांनी घेतला सुविधांचा आढावा
नागपूर : यंदाच्या श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी नवरात्रोत्सवादरम्यान कोराडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ८ ते १० आॅक्टोबर या दरम्यान साजरा होणाऱ्या या महोत्सवाला देशभरात पोहोचवण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. या महोत्सवादरम्यान ‘हेलिकॉप्टर शो’ होणार असून पाण्यावरील विमानाचेदेखील सादरीकरण होणार आहे.
८ आॅक्टोबर रोजी पहाटे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल. कोराडी महोत्सवात मुख्य आकर्षण ‘हेलिकॉप्टर शो’ आणि पाण्यावरील विमान (सी प्लेन) राहील. या दोन्हीची जबाबदारी माजी आमदार आशिष जयस्वाल यांच्यावर टाकण्यात आली. ‘हेलिकॉप्टर शो’ व ‘सी प्लेन’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. यासंबंधात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी एकूण तयारी व सुविधांचा आढावा घेतला
दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. पीयूष कुमार हे या महोत्सवासाठी कार्यक्रमांचे नियोजन करीत आहेत. संपूर्ण देशभरातील मोठ्या कलाकारांची हजेरी या महोत्सवाला राहणार आहे. देशभर हा उत्सव पोहोचावा असे नियोजन करण्यात येणार आहे. गरबा, सांस्कृतिक कार्यक्रम, मोठे कार्यक्रम, देवीचा गोंधळ, देशाच्या संस्कृतीची जनजागृती करणाऱ्या कार्यक्रमांचा यात समावेश राहणार असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले. गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन सभागृहात ही आढावा बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, कोराडीच्या सरपंच अर्चना मैंद, महादुला नगर पंचायत अध्यक्ष सीमा जयस्वाल, जि.प. सीईओ कादंबरी बलकवडे, माजी आमदार अ‍ॅड. आशिष जयस्वाल, उपविभागीय अधिकारी, संस्थानचे सर्व विश्वस्त व पदाधिकारी, गटविकास अधिकारी उपस्थित होते.


मंदिरकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर पथदिवे
महानिर्मितीला कोराडी, खापरखेडा व मंदिराकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवर एलईडी पथदिवे लावण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. महादुला पंपहाऊस, महादुला ते सुरादेवी, महादुला ते मंदिर, मागील बाजूचे कंपाऊंड या रस्त्यांवर एलईडी लाईट लावण्याचे निर्देश देण्यात आले. ग्रामपंचायतने घनकचरा व्यवस्थापनाची व्यवस्था करावी. भाविकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे म्हणून पाच अल्ट्रा फिल्टर वॉटर प्लान्ट एक हजार लिटरवाले लावावे. ग्रामपंचायतने प्रसाधन व्यवस्थेचा आराखडा तयार करून मंजूर करवून घ्यावा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या आहेत.

Web Title: 'Helicopter show' during the Koriadi Mahotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.