संघ मुख्यालयाजवळ मनोरुग्णाचा हैदोस

By Admin | Updated: August 27, 2016 01:54 IST2016-08-27T01:54:06+5:302016-08-27T01:54:06+5:30

संघ मुख्यालयाजवळच्या इमारतीवर चढून एका मनोरुग्णाने गुरुवारी पहाटे प्रचंड हैदोस घातला.

Hedos of psychosis near union headquarters | संघ मुख्यालयाजवळ मनोरुग्णाचा हैदोस

संघ मुख्यालयाजवळ मनोरुग्णाचा हैदोस

टॉवरवर चढला तीन तास गोंधळ नागरिकांसोबत पोलिसांनाही धमक्या
नागपूर : संघ मुख्यालयाजवळच्या इमारतीवर चढून एका मनोरुग्णाने गुरुवारी पहाटे प्रचंड हैदोस घातला. तब्बल तीन तास त्याने परिसरातील नागरिक आणि पोलिसांना धमक्या दिल्या. शेवटी त्याला कसेबसे ताब्यात घेऊन पोलिसांनी मनोरुग्णालयात दाखल केले. सुरेश सुदनलाल नेवारे (वय २७) असे त्याचे नाव असून, तो सिवनी (मध्यप्रदेश) जवळच्या ब्राह्मणी गावातील रहिवासी आहे.

दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्यामुळे संघ मुख्यालयाला अतिउच्चदर्जाचे सुरक्षा कवच आहे. हे असताना घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे. संघ मुख्यालयाजवळच्या मुधोजी मार्गावर विठ्ठलराव बावणे यांच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. आरोपी सुरेश हा रेशीमबाग परिसरात फिरतो. गुरुवारी पहाटे २ च्या सुमारास तो बावणे यांच्या निर्माणाधीन इमारतीच्या टॉवरवर (चौथ्या माळ्यावर) चढला. त्याने तेथून आरडाओरड सुरू केली. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी नियंत्रण कक्षाला कळविले. नियंत्रण कक्षाने कोतवाली पोलिसांना पहाटे ३च्या सुमारास माहिती देऊन घटनास्थळी पाठवले. पोलीस पोहचेपर्यंत तेथे बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. मनोरुग्ण सुरेशच्या हातात लाकडाची जाडजूड फळी होती. तो खाली जमलेल्यांना शिवीगाळ करून धमक्या देत होता. पोलीस पोहचल्याचे पाहून त्याने जास्तच गोंधळ सुरू केला. इकडे (इमारतीवर) कुणी चढल्यास त्याला ठार मारेन, खाली उडी मारेन, अशी धमकीही देऊ लागला. त्यामुळे पोलिसांनी त्याची खाली उतरण्यासाठी मनधरणी सुरू केली. त्याची नजर चुकवून काही पोलीस टॉवरवर चढले आणि त्यांनी पहाटे ५ वाजता सुरेशला खाली उतरवले. त्यानंतर त्याला मेडिकलमध्ये नेण्यात आले. तो मनोरुग्ण असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यामुळे त्याच्याविरुद्ध मनोरुग्ण कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल केला. सुरेशने ठाण्यातही गोंधळ सुरू केला. तो काहीही करू शकतो, हे ध्यानात आल्याने पोलिसांनी त्याला मनोरुग्णालयात दाखल केले.

सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
संघ मुख्यालयावर यापूर्वी दहशतवादी हल्ला झाला असून, अनेक दहशतवादी संघटनांच्या हिटलिस्टवर संघ मुख्यालय आणि संघ प्रमुख आहेत. त्यामुळे संघ मुख्यालयाला आत-बाहेर त्रिस्तरीय उच्च दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली आहे. असे असताना या संवेदनशील स्थळाच्या बाजूलाच एका मनोरुग्णाने तब्बल तीन तास गोंधळ घातल्याने येथील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Web Title: Hedos of psychosis near union headquarters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.