नागपुरात वादळ, मेघगर्जनेसह पावसाची जाेरदार हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:15 IST2021-03-13T04:15:10+5:302021-03-13T04:15:10+5:30
नागपूर : हवामान विभागाने १२ व १३ मार्च राेजी विजांचा कडकडाट, वादळ व मेघगर्जनेसह पाऊस येण्याचा अंदाज वर्तवला हाेता. ...

नागपुरात वादळ, मेघगर्जनेसह पावसाची जाेरदार हजेरी
नागपूर : हवामान विभागाने १२ व १३ मार्च राेजी विजांचा कडकडाट, वादळ व मेघगर्जनेसह पाऊस येण्याचा अंदाज वर्तवला हाेता. विभागाचा अंदाज खरा ठरवत शुक्रवारी नागपूर जिल्ह्यासह इतर ठिकाणी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे गेल्या आठ-दहा दिवसांपासून उन्हाच्या तडाख्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.
शुक्रवारी आकाशात काहीसे ढग दाटले असले तरी उन्हाचा तडाखा कायम हाेता. दिवसाचे कमाल तापमान ३७.२ अंश नाेंदविण्यात आले. त्यामुळे दिवसभर नागरिकांना गरमी सहन करावी लागली. रात्रीच्या तापमानात १.१ अंशाची घट हाेत १९.९ अंश किमान तापमान नाेंदविले गेले. रात्री ८.३० वाजतानंतर वातावरणाने कूस बदलली. रात्री ९.३० वाजताच्या सुमारास विजांचा कडकडाट व मेघांचा गडगडाट सुरू झाला. सुसाट वाहणाऱ्या वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. नागपूर शहरात विजांच्या कडकडाट व वादळासह अवकाळी पावसाने जाेरदार हजेरी लावली. यासह जिल्ह्यातील कळमेश्वर शहरात तसेच सावनेर तालुक्यातील पिपळा डाकबंगला येथेही मेघगर्जना व वादळासह पाऊस पडला. हवामान विभागाने विदर्भातील काही जिल्ह्यात दाेन दिवस पाऊस हाेण्याचा अंदाज व्यक्त केला हाेता. उत्तर राजस्थान व आसपासच्या प्रदेशात सायक्लाेनिक सर्क्युलेशन झाल्याने तसेच पश्चिम हिमालयाच्या परिसरात काही बदल झाल्याने अरबी समुद्रातील आर्द्रता वाऱ्यासह वाहत आल्याने पाऊस झाल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे.
ब्रह्मपुरी सर्वात हाॅट
- शुक्रवारी विदर्भात सर्वाधिक ३९.१ अंश तापमानासह चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहर सर्वात हाॅट ठरले तर चंद्रपूर, अकाेला व वाशिममध्ये कमाल तापमान ३९ अंश नाेंदविले गेले. यासह अमरावती ३८.२, बुलडाणा ३७.२, गडचिराेली ३६.४, गाेंदिया ३६, वर्धा ३८.४, यवतमाळात ३८.७ अंश कमाल तापमानाची नाेंद करण्यात आली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार १३ मार्चलासुद्धा वादळवाऱ्यासह पाऊस राहणार असून त्यानंतरचे तीन-चार दिवस मात्र वातावरण सामान्य राहील व तापमानही सामान्य स्तरापेक्षा १ अंशाने वाढेल.
भाजीपाल्यासह संत्र्याचे नुकसान
-सध्या शेतकऱ्यांच्या शेतात हरभरा, गहू कापणीला आला आहे. काहींनी ताे कापून शेतातच जमा केला हाेता. शुक्रवारी रात्री काही भागात झालेल्या अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने या पिकांचे नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय शेतातील भाजीपाला व संत्र्याच्या मृग बहाराला वादळी पावसामुळे नुकसान झाल्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे.