नागपूर : शहरात बुधवारी सकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. सकाळी ७.३० वाजतापासून धाे-धाे सरी बरसल्या. पाऊण-एक तास धुवांधार बरसल्यानंतर थांबलेले ढग पुढे दिवसभर शांत राहिले. सायंकाळपर्यंत ९ मि.मी. पाऊस नाेंदविला गेला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या २४ तासात जिल्ह्यात जाेरदार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
मंगळवारी रात्री काही काळ हलक्या सरीनंतर पावसाने उसंत घेतली. बुधवारी सकाळी मात्र काळ्याभाेर ढगांनी आकाश व्यापले हाेते. सकाळी ८ वाजताच्या सुमारास अचानक पावसाची तीव्रता वाढली. हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला हाेता. मुसळधार सरी पाहता ही तीव्रता दिवसभर कायम राहिल, अशी शक्यता वाटत हाेती. या पावसामुळे शाळकरी विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली हाेती. पाऊण तास कोसळलेल्या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले, तर शाळा-काॅलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह कामावर निघालेल्या नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागला. काही ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाला. शहरात सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत ९ मि.मी. पाऊस झाला. जिल्ह्यात मंगळवारी रात्री रामटेक तालुक्याला मुसळधार पावसाने झाेडपले. या भागात सकाळपर्यंत ६४.२ मि.मी. पावसाची नाेंद झाली.
सकाळच्या जाेरदार पावसानंतर ढगांनी विश्रांती घेतली, ती सायंकाळपर्यंत कायम हाेती. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या २४ तासात हलक्या ते मध्यम सरींच्या पावसाची शक्यता कायम आहे. त्यापुढचे दाेन दिवस ४ व ५ सप्टेंबरला विजांचा कडकडाटासह हलका पाऊस हाेईल. त्यानंतर पुन्हा ढगांची सक्रियता वाढेल आणि ८ ते ९ सप्टेंबरदरम्यान पावसाचा जाेर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.