एम्समध्ये लवकरच हृदय शस्त्रक्रिया, मूत्रपिंड प्रत्यारोपण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:08 IST2021-09-26T04:08:52+5:302021-09-26T04:08:52+5:30
नागपूर : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये (एम्स) या वर्षीच्या अखेरपर्यंत किंवा नव्या वर्षाच्या सुरुवातीला हृदय व मेंदूवरील शस्त्रक्रिया आणि ...

एम्समध्ये लवकरच हृदय शस्त्रक्रिया, मूत्रपिंड प्रत्यारोपण!
नागपूर : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये (एम्स) या वर्षीच्या अखेरपर्यंत किंवा नव्या वर्षाच्या सुरुवातीला हृदय व मेंदूवरील शस्त्रक्रिया आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणाला सुरुवात होईल, अशी माहिती एम्सच्या संचालक मेजर जनरल डॉ. विभा दत्ता यांनी दिली.
एम्सच्या तिसऱ्या स्थापना दिनाच्या निमित्ताने शनिवारी आयोजित पत्रपरिषदेत त्या बोलत होत्या. डॉ. दत्ता म्हणाल्या, २६ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता स्थापना दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती पवार, पालकमंत्री नितीन राऊत आणि आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे सचिव राजेश भूषण हे ऑनलाईन तर खा.डॉ. विकास महात्मे व एम्स नागपूरचे अध्यक्ष डॉ. पी. के. दवे हे प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. पत्रपरिषदेला एम्सचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार उपस्थित होते.
- एमबीबीएसच्या ५० वरून १२५ जागा
डॉ. दत्ता म्हणाल्या, नागपूर एम्सच्या एमबीबीएसची सुरुवात ५० जागेवरून होऊन आता १२५ झाली आहे. १६ विभागात पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा (पीजी) प्रत्येकी दोन अशा ३२ जागा आहेत. यातील २५ जागा भरण्यात आल्या आहेत. सध्या बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) पूर्ण क्षमतेने सुरू आहे. आंतररुग्ण विभागाचे (आयपीडी) बांधकाम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. यामुळे ११ विभागाचे वॉर्ड मर्यादित खाटेसह सुरू करण्यात आले आहेत.
-कोरोनानंतर वाढली ओपीडी
डॉ. दत्ता म्हणाल्या, कोरोनाचा काळात दोनशे ते तीनशेच्या दरम्यान असलेली ‘ओपीडी’ आता हजारावर गेली आहे. दिवसेंदिवस ही संख्या वाढत आहे. सध्या ३५० खाटा रुग्णसेवेत आहेत. या वर्षाच्या अखेरपर्यंत खाटा वाढून ७६० करण्याचा प्रयत्न आहे.
- कोरोनाचा संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी १५० खाटा
कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरणार असल्याची शक्यता आहे. यामुळे मुलांसाठी १५० खाटांची सोय केली आहे. लहान मुलांना लागणाऱ्या व्हेंटिलेटरसह इतरही यंत्रसामग्री व ऑॅक्सिजनची सोय उभारली जात असल्याचेही डॉ. दत्ता यांनी सांगितले.
- यूरोलॉजी, न्यूरोलॉजी व हृदय शल्यचिकित्सकाची लवकरच पद भरती
‘एम्स’मध्ये नुकतेच ‘कॅथलॅब’ सुरू करण्यात आले. यामुळे याचा फायदा रुग्णांना होत आहे. लवकरच यूरोलॉजी, न्यूरोलॉजी व हृदय शल्यचिकित्सकाचे पद भरले जाणार आहे. यामुळे या वर्षाच्या अखेरपर्यंत किंवा नव्या वर्षाच्या सुरुवातीला मूत्रपिंड प्रत्यारोपण सुरू होईल. सोबतच हृदय व मेंदूवरील गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांना सुरुवात होईल, अशी माहितीही डॉ. दत्ता यांनी दिली.