जातीय अत्याचारात आरोग्य सेवकास कारावास
By Admin | Updated: March 31, 2017 03:02 IST2017-03-31T03:02:16+5:302017-03-31T03:02:16+5:30
आरोग्य सेविकेला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे

जातीय अत्याचारात आरोग्य सेवकास कारावास
नागपूर : आरोग्य सेविकेला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे विशेष न्यायाधीश ओ. पी. जयस्वाल यांच्या न्यायालयाने आरोपी आरोग्य सेवकाला एक वर्ष सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
जयवंत ऊर्फ जयंत सूर्यभान राऊत (४८) असे आरोपीचे नाव असून, तो नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिटणीसनगर येथील रहिवासी आहे. बॉबी प्रशांत गोंडाणे (३९) असे फिर्यादी आरोग्य सेविकेचे नाव असून, त्या बाळाभाऊपेठ येथील रहिवासी आहेत.
जातीय अत्याचाराची घटना (अॅट्रॉसिटी) ८ डिसेंबर २०१४ रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली होती. त्यावेळी बॉबी गोंडाणे या महालगाव येथील माता बाल संगोपन उपकेंद्रात आरोग्य सेविका आणि आरोपी जयंत राऊत हा याच ठिकाणी आरोग्य सेवक म्हणून कार्यरत होता.
घटनेच्या दिवशी बॉबी गोंडाणे, त्यांचे पती आणि आणखी एक आरोग्य सेवक सतीश सोळुंके हे उपकेंद्राच्या आवारात बोलत बसले होते. त्याच वेळी जयंत राऊत हा आपल्या मोटरसायकलने आला होता. त्याने उपकेंद्रातून अॅलोपॅथी दवाखान्याची चावी घेऊन दवाखाना उघडला होता. या ठिकाणी त्याला हलचल (दौरा) रजिस्टर न दिसल्याने त्याने दवाखान्याच्या बाहेर येऊन बडबड सुरू केली होती. बॉबी गोंडाणे यांना पाहून त्याने जातीचा उल्लेख करीत ‘या लोकांना काम करता येत नाही, जातीच्या भरवशावर नोकरी लागते, अशा लोकांना मी माझ्याकडे नोकर ठेवतो’, असे तो म्हणाला होता.
प्राप्त तक्रारीवरून बेला पोलीस ठाण्यात भादंविच्या ५०६, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३ (१)(१०) कलमान्वये आरोपी जयंत राऊतविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शीतल वंजारी यांनी करून न्यायालयात आरोपीविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात सरकार पक्षाने नऊ साक्षीदार तपासले.
अॅट्रॉसिटीचा गुन्हा सिद्ध होऊन आरोपीला ही शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयात सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील अॅड. नेवारे, अॅड. महाले यांनी काम पाहिले. उपनिरीक्षक डी. एन. मात्रे, सहायक फौजदार रमेश भुसारी, प्रमोद पाटील, हेड कॉन्स्टेबल नरेंद्र शेंडे, नायक पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र कावळे यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले. (प्रतिनिधी)