जमिनीचे ‘आरोग्य’ बिघडले!
By Admin | Updated: July 18, 2015 02:43 IST2015-07-18T02:43:33+5:302015-07-18T02:43:33+5:30
मनुष्याच्या आरोग्याला जेवढे महत्त्व आहे. तेवढेच महत्त्व जमिनीच्याही आरोग्याला आहे. मात्र शेतकरी हा जमिनीच्या ...

जमिनीचे ‘आरोग्य’ बिघडले!
शेतकरी संकटात : माती परीक्षण विभागाचा अहवाल
जीवन रामावत नागपूर
मनुष्याच्या आरोग्याला जेवढे महत्त्व आहे. तेवढेच महत्त्व जमिनीच्याही आरोग्याला आहे. मात्र शेतकरी हा जमिनीच्या आरोग्याकडे नेहमीच दुलर्क्ष करीत आला आहे. जमिनीचा अति वापर, सेंद्रिय खतांचा अभाव, पाणी व रासायनिक खतांचा असंतुलित वापर यामुळे जिल्ह्यातील जमिनींचे आरोग्य बिघडले असल्याची धक्कादायक माहिती जिल्हा मृद परीक्षण विभागाच्या अहवालातून पुढे आली आहे. परिणामत: जमिनीची उत्पादकता कमी झाली असून शेतकरी संकटात सापडला आहे.
मागील तीन वर्षांपूर्वी जिल्हा माती परीक्षण विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात राष्ट्रीय कृषी विकास योजनेतर्गंत ‘माती परीक्षण कार्यक्रम’राबविण्यात आला आहे. यात जिल्ह्यातील एकूण १०४६ गावांमधील ३६ हजार ५० शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचे नमुने गोळा करू न त्यांचे परीक्षण करण्यात आले आहे. भरघोस उत्पादनासाठी जमिनीमध्ये प्रमुख १६ अन्न घटकांची गरज असते. यात हायड्रोजन (एच-२), आॅक्सिजन (ओ-२), कार्बन (सी), नत्र (एन), स्फुरद (पी२ओ५) व पालाश (के-२ओ) यासह कॅल्शियम, मग्नेशियम, गंघक, लोह, मंगल, तांबे, जस्त, मॉलिब्डेनम, बोरॉन व क्लोरीन या सूक्ष्म मूलद्रव्यांचा समावेश असतो. मात्र माती परीक्षण विभागाच्या रिपोर्टनुसार जिल्ह्यातील जमिनीत ही सर्व मूलद्रव्ये कमी-अधिक प्रमाणात आढळून आली आहेत. कृषी तज्ज्ञांच्या मते, जमिनीचा सामु (पीएच) हा साधारण ७ (प्रति कि. हेक्टर) आवश्यक असतो. परंतु जिल्ह्यातील जमिनीचा सामु हा ७.५ ते ८ पर्यंत आढळून आला आहे. याशिवाय नत्र ०.४१ ते ०.६१ (प्रति कि. हेक्टर), स्पुरद १५ ते २१ व पालाशचे प्रमाण १५१ ते २५० (प्रति कि. हेक्टर) पर्यंत आवश्यक असते. मात्र जिल्ह्यातील जमिनीत नत्रासह स्पुरद ०.६१ ते ०.८० पर्यंत व पालाशचे प्रमाण ३६० पेक्षा अधिक वाढले आहे. याशिवाय तांबे, लोह, मंगल व जस्त या मूलद्रव्यांची मोठ्या प्रमाणात कमतरता निर्माण झाली असून जमिनी नापिक होऊ लागल्या आहेत.
शेतकऱ्यांसाठी नि:शुल्क माती परीक्षण
मागील काही वर्षांपासून शेतकरी रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहे. दुसरीकडे जमिनीत नत्र गोळा करणाऱ्या तूर, मुंग व उडीद यासारख्या पिकांचे लागवड क्षेत्र कमी झाले आहे. त्याचा जमिनीच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला असून उत्पादनात घट होत आहे. यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील मातीचे परीक्षण करू न, त्यानुसार पाणी व खताचा वापर करणे आवश्यक आहे. जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी विभागात शेतकऱ्यांसाठी नि:शुल्क माती परीक्षणाची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. तरी शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा.
- अर्चना राऊत (कोचरे), जिल्हा मृद सर्वेक्षण अधिकारी