डिझेल कार्डचा गैरवापर करून ट्रान्सपोर्ट कंपनीला लावला चुना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:07 IST2021-07-21T04:07:08+5:302021-07-21T04:07:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - सेंट्रल एव्हेन्यूवरील एका ट्रान्सपोर्ट कंपनीच्या कर्मचाऱ्याने डिझेल कार्डचा दुरुपयोग करून दोन वर्षांत कंपनीला ९ ...

डिझेल कार्डचा गैरवापर करून ट्रान्सपोर्ट कंपनीला लावला चुना
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - सेंट्रल एव्हेन्यूवरील एका ट्रान्सपोर्ट कंपनीच्या कर्मचाऱ्याने डिझेल कार्डचा दुरुपयोग करून दोन वर्षांत कंपनीला ९ लाखांचा चुना लावला. लकडगंज पोलीस ठाण्यात सोमवारी या प्रकरणी आरोपी मोहम्मद शोएब शमी कुरेशी (रा. स्वामी विवेकानंदनगर, कामठी) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
शामसुंदर गणपतलाल अग्रवाल (वय ५१, रा. राधाकृष्ण मंदिरजवळ, वर्धमाननगर) यांचे सेंट्रल एव्हेन्यूवर ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यालय आहे. येथे आरोपी शोएब काम करायचा. त्याच्यावर वाहनाच्या डिझेलच्या व्यवहाराची जबाबदारी होती. त्याचा दुरुपयोग करून आरोपीने १० नोव्हेंबर २०१९ ते ३ जुलै २०२० या कालावधीत ८ लाख, ९९ हजार, ५९८ रुपयांचा अपहार केला. प्रत्यक्ष व्यवहार आणि आरोपीने केलेल्या नोंदी याचा ताळमेळ बसत नसल्याने कंपनी मालकाने त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याला संधी देऊनही गुन्हा केल्याचे मान्य करून तो अपहार केलेली रक्कम जमा करायला तयार नसल्याने अग्रवाल यांनी लकडगंज ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी शोएबविरुद्ध सोमवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
----