जास्त वीज बिल आले म्हणून त्याने स्वत:लाच पेटवून घेतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 10:29 IST2020-08-10T10:28:12+5:302020-08-10T10:29:16+5:30
४० हजाराचे वीज बिल आल्यानंतर ते कमी करून मिळण्याऐवजी वीज विभागाकडून मिळत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून एका व्यक्तीने स्वत:ला जाळून घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

जास्त वीज बिल आले म्हणून त्याने स्वत:लाच पेटवून घेतले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ४० हजाराचे वीज बिल आल्यानंतर ते कमी करून मिळण्याऐवजी वीज विभागाकडून मिळत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून एका व्यक्तीने स्वत:ला जाळून घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. लीलाधर लक्ष्मण गायधने (वय ५६) असे मृत व्यक्तीचे नाव असून, ते यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाहुणे ले-आऊटमध्ये राहत होते.
गायधने खासगी काम करायचे. त्यांचे स्वत:चे घर आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना ४० हजार रुपये वीज बिल आले होते. एवढे मोठे बिल आल्यामुळे त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे अनेकदा हेलपाटे मारले. बिल कमी करून मिळावे म्हणून विनंत्या केल्या. मात्र त्यांना दिलासा मिळाला नाही. उलट वीज बिल भरले नाही तर पुरवठा खंडित करू, अशी धमकी मिळाली. त्यामुळे तणावात आलेल्या गायधने यांनी शनिवारी दुपारी १ च्या सुमारास स्वत:च्या अंगावर रॉकेल टाकून घरासमोर पेटवून घेतले. ते पाहून कुटुंबीयांनी धाव घेतली व गंभीर अवस्थेतील गायधने यांना मेयोत नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी काही वेळातच त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.