वो लम्हा कहा था मेरा...
By Admin | Updated: January 28, 2015 01:05 IST2015-01-28T01:05:34+5:302015-01-28T01:05:34+5:30
सुप्रसिद्ध पार्श्वगायक, संगीतकार शंकर महादेवन म्हणजे गळ्यातून नव्हे हृदयातून गाणे म्हणणारा गायक कलावंत. त्यामुळेच शंकर महादेवन यांनी सादर केलेली गीते रसिकांच्या थेट

वो लम्हा कहा था मेरा...
शंकर महादेवन यांच्या गीतांनी रंगली मैफिल : दिल्ली पब्लिक स्कूल
नागपूर : सुप्रसिद्ध पार्श्वगायक, संगीतकार शंकर महादेवन म्हणजे गळ्यातून नव्हे हृदयातून गाणे म्हणणारा गायक कलावंत. त्यामुळेच शंकर महादेवन यांनी सादर केलेली गीते रसिकांच्या थेट हृदयाचा ठाव घेतात. स्वरांची उत्तम आणि उत्कट जाण आणि त्यांच्या गायनात असणारा दर्द रसिकांना घायाळ करणारा असतो. याचा प्रत्यय आज दिल्ली पब्लिक स्कूल, कामठी मार्ग येथे आला. त्यांनी आपल्या अगदी कमी वेळातल्या सादरीकरणात यावेळी उपस्थितांना जिंकले.
शंकर महादेवन यांनी त्यांच्या नावाची संगीत अकादमी स्थापन केली आहे. या अकादमीच्या स्कूलमधील शाखेच्या वार्षिक कार्यक्रमासाठी ते नागपुरात आले होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांसह काही गीत सादर करुन त्यांनी रसिकांची दाद घेतली. प्रारंभी अकादमीच्या विद्यार्थ्यांनी काही उपशास्त्रीय गीतांचे सादरीकरण त्यांच्यासमोर करून रसिकांची दाद घेतली. पण शंकर महादेवन यांच्यासारखा महान गायक उपस्थित असताना रसिक त्यांना गीत सादर केल्याशिवाय सोडणार नव्हतेच. त्यांना गीत सादरीकरणाचा आग्रह झाल्यावर शंकर महादेवन यांनी काही गीते सादर करुन उपस्थितांना आनंद दिला. आपल्या गायनाचा प्रारंभ त्यांनी गणेशवंदना ‘गणाधिशाय वक्रतुंडाय..’ने केला. त्यानंतर मात्र लोकप्रिय गीते सादर करून त्यांनी रसिकांच्या हृदयाला हात घातला आणि संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर गीत सादरीकरणाचे प्रात्यक्षिकही सादर केले. प्रत्येक सप्तकात सारख्याच ताकदीने फि रणारा आवाज, गाण्यातील आशय योग्य पद्धतीने पोहोचविण्याचे त्यांचे कौशल्य, गायनातील नजाकतीच्या हरकतींनी त्यांनी अक्षरश: जिंकले. यानंतर त्यांनी प्रसिद्ध गीत ‘सॅनोरिटा...’ सादर करुन धमाल केली. ‘तारे जमीं पर...’ या गीताने तर त्यांनी अनेकांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या. यानंतर त्यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्या रवींद्र संगीताचा बाज असलेले बंगाली गीत ‘एकला चलो रे...’ सादर करून रसिकांची दाद घेतली. विशेषत: जागतिक संगीताचे वेगवेगळे प्रवाह आणि त्यांची शैली विद्यार्थ्यांना समजून घेता यावी म्हणून त्यांनी भारतीय अभिजात शास्त्रीय संगीताचे सरगम वेगवेगळ्या पाश्चात्त्य शैलीत सादर करुन उपस्थितांना आश्चर्यचकित केले. संगीत क्षेत्रात जागतिक स्तरावर टिकायचे असेल तर प्रत्येक संगीत शैलींचा अभ्यास असणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. भारतीय गायक असूनही पाश्चात्त्य शैलींवर असलेले त्यांचे प्रभुत्व पाहून रसिकांनीही त्यांना मनमोकळी दाद दिली.
याप्रसंगी अजय झिंगराल यांची रचना असलेले ‘अभी मुझमे कही है ये थोडी सी ये जिंदगी ’ ही रचना सादर केली. अजय झिंगराल यांच्या मृत्यूपूर्वी त्यांनी लिहिलेली ही रचना त्यातील उत्कटता आणि जीवनाच्या शोधाच्या अर्थामुळे खूप प्रसिद्ध आहे. ही रचना त्याच उत्कट स्वरात सादर करुन त्यांनी वातावरण हळवे केले. त्यांच्या या गीताला टाळ्यांच्या कडकडाटाने गौरविले गेले. या गीतानेच त्यांनी गायनाचा समारोप केला पण रसिकांच्या खास आग्रहास्तव त्यांनी अखेर त्यांचे ‘ब्रेथलेस’ सादर करुन उपस्थितांवर मोहिनी घातली. याप्रसंगी त्यांची पत्नी संगीता महादेवन आणि मुलगा सिद्धार्थ महादेवन प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमात सिद्धार्थ महादेवन यांनीही काही गीतांचे सादरीकरण केले. विशेषत: पाश्चात्त्य शैलीतील गीतांच्या सादरीकरणाबाबत त्यांनी प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले. याप्रसंगी शाळेचे प्राचार्य अखिलेश चतुर्वेदी, श्रीधर रघुनाथन, अजय मनसुखानी आदी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आधुनिक संगीत आणि तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन
भारतीय अभिजात शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी शंकर महादेवन यांनी आॅनलाईन संगीत अकादमीचा प्रारंभ २४ देशांमध्ये केला आहे. नागपुरातील दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये या अकादमीच्या माध्यमातून नर्सरी ते इयत्ता आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना संगीताचे शिक्षण दिले जाते. अकादमीतर्फे विद्यार्थ्यांमध्ये संगीताची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. शास्त्रीय संगीत शिकताना ते कंटाळवाणे वाटणार नाही, अशा विशिष्ट पद्धतीने ते शिकविले जाते. याप्रसंगी अकादमीच्या ३०० विद्यार्थी आणि शिक्षकांनी शंकर महादेवन यांच्या उपस्थितीत संगीताचा कार्यक्रम सादर केला. सिद्धार्थ यांनीही उपस्थितांना आधुनिक गीते कशी तयार होतात, त्यासाठी तंत्रज्ञानाची मदत कशी घ्यावी आणि कुठले सॉफ्टवेअर उपयोगात आणावे, याबाबत मार्गदर्शन केले.