तो पोटात चाकू घेऊन पोहचला पोलीस ठाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2021 11:12 PM2021-06-07T23:12:05+5:302021-06-07T23:12:41+5:30
knife in stomach , police station पोटात चाकू घेऊन बराच वेळपर्यंत तो इकडे तिकडे फिरत होता अन् त्याच अवस्थेत तो कपिलनगर पोलीस ठाण्यात पोहचला. ते पाहून काही वेळेसाठी पोलिसही हादरले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रागावून बघत असल्याच्या क्षुल्लक कारणावरून तरुणांच्या दोन गटांत वाद झाला. त्यानंतर, भेटायला बोलावण्याचा बहाणा करून ८ ते १० आरोपींनी तिघांवर हल्ला केला. त्यातील एकाला चाकूने भोसकून जबर जखमी केले. विनय सूरज राबा (वय १८) असे त्याचे नाव आहे. विनय पोटात चाकू घेऊन बराच वेळपर्यंत तो इकडे तिकडे फिरत होता अन् त्याच अवस्थेत तो कपिलनगर पोलीस ठाण्यात पोहचला. ते पाहून काही वेळेसाठी पोलिसही हादरले.
रविवारी रात्री १०.३० ते ११ च्या दरम्यान कपिलनगरात ही घटना घडली. कुणाल उर्फ लकी प्रताप वाघमारे आणि कल्पेश उर्फ दादा सूरज राबा (वय १९) अशी या हल्ल्यात जबर जखमी झालेल्या अन्य दोघांची नावे आहेत.
कल्पेशने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी सलमान शेख, जावेद, राजिक उर्फ राजा आणि समशेर यांच्यासोबत विनय आणि कल्पेशची दोन दिवसांपासून धुसफूस सुरू होती. तू आमच्याकडे रागाने का बघतो, अशी विचारणा करून, आरोपींनी वाद वाढविला होता. रविवारी रात्री १०.३० वाजता आरोपी सलमानने कल्पेशला याबाबत चर्चा करण्याच्या बहाण्याने कपिलनगरातील एका मैदानात बोलवले. त्यानंतर, कल्पेश त्याचा भाऊ विनय आणि कुणाल वाघमारे नामक एका मित्राला घेऊन गेला. तेथे आरोपी सलमान, समशेर, जावेद, इम्रान, समीर अली, शाहरुख पठाण, मोहम्मद राजिक, साहिल शेंडे, आकाश केतवास आणि त्यांचे साथीदार होते. त्यांनी कल्पेश, तसेच त्याचा भाऊ आणि मित्राला ‘बहोत गरम चल रहे क्या’ म्हणत मारहाण केली. आरोपींनी विनयला चाकूने भोसकले. ते पाहून कल्पेश आणि कुणाल मदतीला धावले असता आरोपींनी त्यांच्यावरही चाकूहल्ला केला. आरडाओरड ऐकून आजूबाजूची मंडळी धावली. त्यांनी आरोपींना कसेबसे आवरले. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. कपिलनगरचे ठाणेदार अमोल देशमुख आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धावले. तर, इकडे विनय, कल्पेश तसेच कुणाल हे तिघे जखमी अवस्थेत पोलीस ठाण्यात पोहचले. विनय पोटात चाकू घेऊन तशाच अवस्थेत ठाण्याच्या आवारात फिरत होता. ॲम्बुलन्स आल्यानंतर त्याला बसवून रुग्णालयात नेण्यात आले.
प्रचंड तणाव
या घटनेनंतर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. जमाव पोलीस ठाण्याच्या आवारात पोहचला. पोलिसांनी संतप्त जमावाची समजूत काढली. त्यानंतर आरोपींच्या घराकडे मोठा बंदोबस्त लावण्यात आला. पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांनी पोलीस ठाण्यात भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली. दरम्यान,
पोलिसांनी रात्रभर धावपळ करून १४ पैकी दोन अल्पवयीन आरोपींसह सहा जणांना ताब्यात घेतले. त्यातील चाैघांना एपीआय श्रीकांत संघर्षी यांनी न्यायालयात हजर करून त्यांचा ११ जूनपर्यंत पीसीआर मिळवला. फरार आरोपींची पोलीस चौकशी करत आहेत.