मृत्यूने झपाटले पण ‘तो’ निसटला .....
By Admin | Updated: February 1, 2015 01:01 IST2015-02-01T01:01:19+5:302015-02-01T01:01:19+5:30
साक्षात मृत्यू बनून आलेला सळाकींचा एक भरधाव अनियंत्रित मिनी ट्रक सायकलस्वार शाळकरी मुलावर धडकणार तोच प्रसंगावधान राखून मुलाने सायकल सोडून रस्त्याच्या कडेला उडी घेतली

मृत्यूने झपाटले पण ‘तो’ निसटला .....
शाळकरी मुलाचे असेही प्रसंगावधान
नागपूर : साक्षात मृत्यू बनून आलेला सळाकींचा एक भरधाव अनियंत्रित मिनी ट्रक सायकलस्वार शाळकरी मुलावर धडकणार तोच प्रसंगावधान राखून मुलाने सायकल सोडून रस्त्याच्या कडेला उडी घेतली आणि तो थोडक्यात बचावला.
नक्कीच मुलगा चिरडल्या गेला असावा, अशी कल्पना करीत अंगाचा थरकाप झालेल्या रस्त्यावरील लोकांनी आरडाओरड करीत घटनास्थळी धाव घेतली. पण प्रत्यक्षात चुराडा सायकलचा झाला होता.
ही घटना शनिवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास छापरूनगर चौकात घडली. उदय मिश्रा (१३), असे या नशीबवान मुलाचे नाव असून तो लकडगंज भागातील उमियाशंकर विद्यालयाचा विद्यार्थी आहे.
हा थरार पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, उदय हा पुस्तक घेण्यासाठी लकडगंज झोन कार्यालयाकडून छापरूनगर चौकाकडे सायकलने जात होता. त्याच वेळी हरिहर मंदिराकडून सळाकींनी भरलेला एमएच-३१-५२०९ क्रमांकाचा मिनी ट्रक आला. तो भरधाव वेगात होता. तो छापरूनगर चौकाकडे सरसावताच रस्तादुभाजकाच्या नजीक या ट्रकच्या मागील चाकात सायकल फसली. क्षणात प्रसंगावधान राखून उदयने सायकल सोडून रस्त्याच्या कडेला उडी घेतली. तो बचावला, त्याच्या पायाला थोडे खरचटले. परंतु सायकलचा पूर्णत: चुराडा झाला होता.
या घटनेनंतर ट्रकचालक आणि क्लिनर ट्रक सोडून पळून गेले. घटनास्थळी दाखल झालेल्या लकडगंज पोलिसांनी अन्य एका चालकाच्या मदतीने हा ट्रक पोलीस ठाण्याकडे नेण्याचा प्रयत्न केला. फसलेला ट्रक मागे घेतला जात असतानाच ब्रेक निकामी झाल्याने तो काही अंतर धावत राहिला. रस्त्यावरील लोक जीव मुठीत घेऊन सैरावैरा पळत राहिले. अखेर हा ट्रक वाहतूक सिग्नलच्या खांबाला धडकला. त्यामुळे खांब रस्त्यावर कोसळले. काही क्षणापूर्वीच या ठिकाणाहून एक मोटरसायकलस्वार निघून गेला होता. (प्रतिनिधी)