He became a 'RAW agent' to get married: Mumbai police's Pantar arrested | लग्न करण्यासाठी तो बनला ‘रॉ’ एजंट : मुंबई पोलिसांच्या ‘पंटर’ला अटक
लग्न करण्यासाठी तो बनला ‘रॉ’ एजंट : मुंबई पोलिसांच्या ‘पंटर’ला अटक

ठळक मुद्दे२४ तास चालले नाट्य, वरिष्ठ अधिकारीही हादरले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लग्न करण्यासाठी स्वत:ला ‘रॉ’ एजंट असल्याचे सांगून मुंबई पोलिसांच्या एका ‘पंटर’ने शहर पोलिसांची झोप उडविली. २४ तास चाललेल्या या ‘ड्रामा’नंतर युवकाचा बोगसपणा उघडकीस आला. गिट्टीखदान पोलिसांनी त्याला अटक केली आहे. इमरान खान नूर मोहम्मद खान (३९) रा. शिवाजीनगर गोवंडी मुंबई, असे आरोपीचे नाव आहे.
पोलीस सूत्रानुसार इमरान हा मुंबई पोलिसांचा पंटर म्हणून काम करतो. त्यामुळे त्याला पोलीस आणि गुन्हेगारी जगताची माहिती आहे. तो घटस्फोटित आहे. दोन महिन्यापूर्वी त्याची गिट्टीखदान परिसरातील एका ३५ वर्षीय महिलेसोबत ओळख झाली. ती महिला ब्युटी पार्लर चालवते. तीसुद्धा घटस्फोटित असून, ती लग्न करण्यासाठी चांगल्या मुलाच्या शोधात होती. दोन महिन्यापूर्वी तिची व इमरानसोबत फेसबुकवर मैत्री झाली. इमरानने स्वत:ची ओळख ‘रॉ’ एजंट म्हणून दिली. पाकिस्तानमध्ये आपले येणे-जाणे असल्याने त्याने सीमेपलीकडे अनेक आॅपरेशन केल्याचेही तिला सांगितले. त्याच्या बोलण्याने ती प्रभावित झाली. इमरानने तिला लग्नाची मागणी घातली. महिलेनेही ती स्वीकारली. तो तिला भेटण्यासाठी १५ दिवसापूर्वी नागपुरात आला. महिलेने आपल्या कुटुंबीयांना त्याच्याबद्दल सांगितले. लग्न करणार असल्याने तो तिच्या घरीच कुटुंबीयांसोबत तो राहू लागला. त्याने महिलेच्या बहीण-भावाला नोकरी लावण्यासोबतच बहिणीचे डुबलेले दोन लाख रुपये वसूल करून देण्याचाही विश्वास दिला.
इमरानने तिच्याशी लग्न करण्यासाठी नवीन घर खरेदी करण्याची इच्छा दर्शविली. त्याने काटोल रोडवरील फ्रेण्ड्स कॉलनीमध्ये एक बंगलाही पाहिला. बंगल्याच्या मालकाला बंगल्यात काही सुधारणा करण्यासही सांगितले. दीड कोटी रुपयात बंगला खरेदी करण्याची तयारी त्याने दर्शविली. यादरम्यान १५ दिवसात वेगवेगळी कारणे सांगून त्याने महिलेकडून ३० हजार रुपये घेतले. त्याच्या एकूणच व्यवहारावरून महिलेला संशय आला. तिने मंगळवारी इमरानच्या आई-वडिलांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु आई-वडिलांचा मृत्यू झाल्याचे त्याने सांगितले. घरी त्याच्याशिवाय दुसरा कुणीही नाही, असेही सांगितले. यानंतर महिलेने त्याला ‘रॉ’चे ओळखपत्र दाखविण्यास सांगितले. यावर तो कुठलेही समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. यामुळे तिचा संशय आणखीनच वाढला. तिने फटकार लावताच इमरान दुखावला गेला. इमरान स्वत: गिट्टीखदान पोलीस ठाण्यात गेला. त्याने ठाणेदार सतीश गुरव यांची भेट घेतली.
त्यांनाही त्याने रॉ एजंट असल्याचे सांगत महिलेसोबत लग्न करण्यास मदत करण्यास सांगितले. परंतु गुरव यांनी पोलीस खासगी प्रकरणात दखल देत नसल्याचे सांगून परत पाठवले. इमरानने महिलेच्या घरी गेल्यावर पुन्हा वाद घातला. असे सांगितले जाते की, त्याने आर्थिक शाखेच्या डीसीपी श्वेता खेडकर आणि अतिरिक्त महासंचालक अर्चना त्यागी यांनाही फोन केला आणि रॉ एजंट असल्याचे सांगून लग्नासाठी मदत करण्यास सांगितले. दोन्ही अधिकाऱ्यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्याशी संपर्क केला. यानंतर पोलीसही खडबडून जागे झाले. गिट्टीखदान पोलीस इमरानला घेऊन ठाण्यात आले. महिलेनेही त्याच्या फसवणुकीची माहिती दिली. एपीआय सुदर्शन गायकवाड यांनी बुधवारी दिवसभर इमरानला विचारपूस केली. त्यावरून त्याचा रॉ शी कुठलाही संबंध नसल्याचे आढळून आले. याआधारावर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून अटक केली.
दुसऱ्यांना प्रभावित करण्यात तरबेज
इमरानच्या बोलण्यावर कुणीही संशय घेऊ शकत नाही. तो इंग्रजीसह आठ भाषांचा जाणकार आहे. त्याच्या बोलण्याने कुणीही सहजपणे प्रभावित होऊ शकतो. यामुळेच महिला व तिचे कुटुंबीयसुद्धा प्रभावित झाले होते. त्याच्या बोलण्यामुळे सुरुवातीला पोलीसही चक्रावून गेले होते. त्याच्या सांगण्यानुसार जेव्हा मुंबईतील काही पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता इमरान पोलिसांचा पंटर असल्याचे उघडकीस आले.
कोट्यवधीची देशी-विदेशी मुद्रा
इमरानने महिलेला त्याचे अनेक देशांसोबत संपर्क असल्याचे आमिष दाखविले होते. त्याच्याकडे कोट्यवधी रुपयाची देशी-विदेशी मुद्रा असल्याचेही सांगितले होते. काही दिवसानंतर त्याला विदेशातून आणखी पैसे येणार असल्याचेही सांगितले होते. इमरानचे नातेवाईक पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये राहतात. याची माहिती होताच सुरुवातीला पोलीसही हादरले होते. त्यामुळे इमरानची अधिक माहिती काढण्यास ते गंभीर झाले. काही वेळातच इमरानचे पितळ उघडे पडले.
आठवडाभरातील दुसरे प्रकरण
लग्नासाठी फसवणूक केल्याचे हे आठवडाभरातील दुसरे प्रकरण आहे. ४ जून रोजी प्रतापनगर येथील एका तरुणीला सैन्यदलातील एका बोगस मेजरने ५० हजार रुपयाचा चुना लावला होता. त्याची ओळखही तरुणीसोबत शादी डॉट कॉमवर झाली होती. दोन लाख रुपये मागितल्यावर तरुणीला संशय आला. यानंतर तिने बोगस मेजरशी संपर्क तोडला होता. पोलिसांना अजूनही त्या बोगस मेजरचा पत्ता लागलेला नाही.

 


Web Title: He became a 'RAW agent' to get married: Mumbai police's Pantar arrested
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.