दुसरे लग्न करण्यासाठी तो बनला डॉक्टर : भोपाळ येथील युवकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 22:27 IST2021-06-11T22:26:56+5:302021-06-11T22:27:28+5:30
Bogus doctor एका युवकाने तो डॉक्टर असल्याचे खोटे सांगून दुसरे लग्न केले. सक्करदरा पोलिसांनी आरोपी युवकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

दुसरे लग्न करण्यासाठी तो बनला डॉक्टर : भोपाळ येथील युवकाला अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका युवकाने तो डॉक्टर असल्याचे खोटे सांगून दुसरे लग्न केले. सक्करदरा पोलिसांनी आरोपी युवकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
शाहनवाज खान ऊर्फ साजेब अली करीम अली (३२) असे आरोपीचे नाव असून तो पीरगेट, भोपाळ येथील रहिवासी आहे. तो ऑटो विक्रीचा व्यवसाय करतो. त्याने शादी डॉट कॉमवर खोटी माहिती अपलोड केली. त्या माध्यमातून त्याची सक्करदरा येथील २८ वर्षीय युवतीसोबत ओळख झाली. त्याने तो डॉक्टर असल्याचे खोटे सांगून युवतीला लग्नाची मागणी घातली. युवतीचे कुटुंबिय अधिक माहिती घेण्यासाठी भोपाळ येथे गेले असता शाहनवाजने त्यांना खोट्या व्यवस्थेद्वारे प्रभावित केले. त्यामुळे युवतीचे व त्याचे लग्न लावण्यात आले. युवतीच्या कुटुंबियांनी तिला दागिन्यांसह ८५ हजार रुपयाच्या भेटवस्तू दिल्या. युवती भोपाळ येथे गेल्यानंतर शाहनवाजचा खोटेपणा पुढे आला. तो विवाहित असल्याचे व त्याला एक मुलगी असल्याची माहिती युवतीला मिळाली. त्यामुळे शाहनवाजने युवतीला ठार मारण्याची व स्वत: आत्महत्या करण्याची धमकी दिली. परिणामी, युवतीने शाहनवाजला प्रेमाने समजावून नागपुरात आणले. येथे आल्यानंतर शाहनवाजला धडा शिकवून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.