अण्णा टोळीचा हैदोस
By Admin | Updated: March 17, 2017 03:03 IST2017-03-17T03:03:16+5:302017-03-17T03:03:16+5:30
वाहनाच्या बाजूला तुमची रक्कम पडून आहे, अशी बतावणी करून वाहनातील रोकड अन् मौल्यवान चिजवस्तू

अण्णा टोळीचा हैदोस
नोटा पडल्याची बतावणी : वाहनातून रोख व चिजवस्तू लंपास, सव्वा तासात तीन घटना
नागपूर : वाहनाच्या बाजूला तुमची रक्कम पडून आहे, अशी बतावणी करून वाहनातील रोकड अन् मौल्यवान चिजवस्तू लंपास करणाऱ्या अण्णा टोळीने उपराजधानीत गुरुवारी अक्षरश: हैदोस घातला. अवघ्या सव्वा तासात तीन वाहनांमधून रोकड आणि पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास केला.
महाबँक चौक : ११. ३० वाजता
शांतिनगरातील रहिवासी धर्मराज शंकर कराडे (वय २८) हे गुरुवारी सकाळी ११.३० वाजता महाबँक चौकात आले. त्यांनी हल्दीरामच्या बाजूला आपली इनोव्हा कार (एमएच ४९/ बी ९८३०) लावली. नाश्ता वगैरे घेतल्यानंतर ते कारमध्ये येऊन बसले असता अंदाजे २५ ते ३० वयोगटातील एक तरुण त्यांच्याजवळ आला. तुमचे पैसे खाली पडले आहे, असे त्याने सांगितले. त्यामुळे कराडेंनी कारच्या खाली उतरून पाहणी केली. तेवढ्या वेळेत आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी कराडेच्या कारमधील बॅग (ज्यात ८० हजारांचा लॅपटॉप होता) लंपास केली. कराडे यांनी सीताबर्डी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदविला.
रामदासपेठ : दुपारी १२ वाजता
शुभम प्रकाश कोरपे (वय २२, रा. संजय गांधीनगर, हुडकेश्वर) गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास रामदासपेठेत आले. त्यांनी आपली झेन कार (एमएच ३०/ पी ४३७) रामदासपेठेतील सोमलवाडा शाळेजवळ उभी केली. ते कारमध्ये बसून असताना २५ ते ३० वयोगटातील एका आरोपीने काचेला ठोकून कोरपेंचे लक्ष वेधले. त्यामुळे कोरपे कारचे दार उघडून बाहेर आले. आरोपीने त्यांना असंबंद्ध माहिती विचारली. त्यानंतर कोरपे कारमध्ये बसले तेव्हा त्यांना कारमधील ३० हजारांचा लॅपटॉप असलेली बॅग आणि कागदपत्रे चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी सीताबर्डी ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी चोरीचा ग ुन्हा नोंदविला.
अजनी चौक : दुपारी १२.४५ वाजता
क्रीडा चौकातील रहिवासी कुसूम सुरेश कोल्हे (वय ५६) या त्यांच्या कारने गुरुवारी दुपारी १२.४५ वाजता वर्धा मार्गावरील अजनी चौकात आल्या होत्या. अॅक्सिस बँकेसमोर त्या कारमध्ये बसून असताना एक अनोळखी आरोपी त्यांच्याजवळ आला. तुमच्या कारजवळ पैसे पडलेले आहे, असे सांगून त्याने कोल्हे यांचे लक्ष विचलित केले. त्यानंतर कारमध्ये सिटवर ठेवलेली हॅन्डबँग ज्यामध्ये रोख ५० हजार, मोबाईल तसेच एटीएम कार्डसह एकूण ७१ हजारांच्या चिजवस्तू होत्या, ती चोरून नेली. त्यांनी धंतोली ठाण्यात या प्रकरणाची तक्रार नोंदवली. धंतोली पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदविला.