लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केवळ आत्महत्या केलेल्या महिलेसोबत अनैतिक संबंध होते म्हणून संबंधित पुरुषाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या गुन्ह्यांतर्गत कारवाई केली जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठातील न्यायमूर्तिद्वय उर्मिला जोशी-फलके व नंदेश देशपांडे यांनी एका प्रकरणात दिला.
गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा पोलिस ठाण्यात कार्यरत वाहन चालक प्रवीण बोरकर यांचे सहकारी महिला पोलिस कॉन्स्टेबलसोबत अनैतिक संबंध होते. त्यामुळे महिला पोलिस कॉन्स्टेबलने ९ डिसेंबर २०२१ रोजी गळफास लावून आत्महत्या केली, असा आरोप करण्यात आला होता. त्यावरून बोरकर यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा एफआयआर व खटला दाखल करण्यात आला होता. त्याविरुद्ध बोरकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
उच्च न्यायालयाने ती याचिका मंजूर केली. बोरकर व मृताचे अनैतिक संबंध होते, याचे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. तसेच, त्यांचे अनैतिक संबंध होते हे मान्य केले तरी बोरकर यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या गुन्ह्यांतर्गत कारवाई केली जाऊ शकत नाही. कारण, बोरकर यांनी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे मृताला आत्महत्या करण्यास बाध्य करणारी कृती केली, मृताने आत्महत्या करावी हा बोरकर यांचा उद्देश होता किंवा बोरकर यांनी मृतापुढे आत्महत्या करण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय शिल्लक ठेवला नव्हता यासंदर्भात एकही पुरावा रेकॉर्डवर नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
आरोपीनेच नेले मृताला रुग्णालयात
आरोपी व मृत महिला शेजारी राहत होते. महिलेने गळफास लावल्यानंतर आरोपीनेच फास काढून तिला उपचारासाठी रुग्णालयात भरती केले होते, अशी माहिती आरोपीचे वकील अॅड. समीर सोनवने यांनी न्यायालयाला दिली. तसेच, अनैतिक संबंध व आत्महत्या याचा दूरपर्यंत काहीच संबंध नाही. अनैतिक संबंधाबाबतही केवळ संशय आहे, याकडे लक्ष वेधले.