‘हॅट्स ऑफ टू मिस्टर मुंढे’ : जनसामान्यांची भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 12:05 AM2020-08-27T00:05:05+5:302020-08-27T00:06:15+5:30

नागपुरातील त्यांचा कार्यकाळ संपणार असला तरी त्यांची ही लहानशी ‘इनिंग’ पुढील अनेक वर्षे हृदयात कायम असेल असे म्हणणाऱ्या नागपूरकरांच्या तोंडून शब्द बाहेर पडत होते...‘हॅट्स ऑफ टू मिस्टर मुंढे’ .

‘Hats off to Mr. Mundhe’: the sentiments of the masses | ‘हॅट्स ऑफ टू मिस्टर मुंढे’ : जनसामान्यांची भावना

‘हॅट्स ऑफ टू मिस्टर मुंढे’ : जनसामान्यांची भावना

Next
ठळक मुद्देबदली झाल्यामुळे रोष, नागपूरवर अन्याय केल्याची भावना

 लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : ‘ते आले, त्यांनी काम केले आणि लोकांना जिंकले’...एखाद्या चित्रपटातील कथा शोभावी अशी त्यांची कारकीर्द राहिली. अवघ्या सात महिन्यात ते जनतेसाठी हक्काचे अधिकारी झाले. मात्र सत्ताकारणाच्या बुद्धिबळात त्यांची कार्यप्रणाली सर्वपक्षीयांना अडचण ठरत गेली आणि पटावरून अलगदपणे त्यांना बाजूला सारण्यात आले. जनसामान्यांना मात्र ते आशेचा नवीन किरण देऊन गेले. नागपुरातील त्यांचा कार्यकाळ संपणार असला तरी त्यांची ही लहानशी ‘इनिंग’ पुढील अनेक वर्षे हृदयात कायम असेल असे म्हणणाऱ्या नागपूरकरांच्या तोंडून शब्द बाहेर पडत होते...‘हॅट्स ऑफ टू मिस्टर मुंढे’ .
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची तडकाफडकी बदली झाल्याची बातमी एखाद्या वणव्यासारखी नागपूरकरांमध्ये पसरली आणि ‘सोशल मीडिया’वर मुंढे यांच्या समर्थनार्थ मोहिमच सुरू झाली. अनेकांनी यासंदर्भात रोष व्यक्त केला आहे. संकटाच्या काळात तुकाराम मुंढे यांच्या नियोजनामुळे उपराजधानी ‘कोरोना’शी लढू शकली. त्यांनी नियमावर चालत केवळ जनतेच्या हितासाठी काम केले. अशा कर्तव्यदक्ष अधिकाºयाची प्रशासनाला कदर नाही का, असा सवाल जनसामान्यांमधून येत आहे.
जानेवारी महिन्यात नागपुरात मनपा आयुक्त म्हणून पदभार सांभाळल्यानंतरच तुकाराम मुंढे यांनी आपल्या कार्यशैलीचा परिचय नागरिकांना दिला. नागरिकांसाठीच त्यांनी जनता दरबार भरविण्यास सुरुवात केली व त्यामुळे वर्षानुवर्षे कार्यालयांमध्ये समस्या घेऊन पायपीट करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. त्यानंतर त्यांनी ‘नागपूर लाईव्ह’ नावाचे ‘मोबाईल अ‍ॅप’ सुरू करण्यात पुढाकार घेतला व अधिकाऱ्यांच्या कामातील गतीच वाढली. कुठलीही समस्या असली तरी ती तातडीने दूर व्हायला लागली व नागपूरकरांना प्रशासनाचे बदललेले रूप पाहायला मिळाले. विशेष म्हणजे कधी नव्हे ते कचऱ्याच्या गाड्यादेखील ‘गाडीवाला आया कचरा निकाल’ असे म्हणत नियमितपणे नागरिकांच्या घरासमोर यायला लागल्या.
मार्च महिन्यात ‘कोरोना’चे संकट धडकले आणि मोठ्या शहरात हाहाकार उडाला. मात्र तुकाराम मुंढे यांनी ‘क्वारंटाईन’चे नियोजन राबविले व साडेतीन महिने नागपुरात स्थिती नियंत्रणात होती. राज्य शासनाच्या यादीत नागपूर ‘रेड झोन’मध्ये नसतानादेखील मुंढे यांनी कठोरपणे ‘लॉकडाऊन’ कायमच ठेवला. शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष व प्रामाणिक अधिकारी अशी त्यांची जनमानसात प्रतिमा निर्माण झाली.
मात्र, अचानक झालेल्या या बदलीमुळे अनेक नागपूरकरांमध्ये रोष आहे. सर्वपक्षीय राजकारणाचा मुंढे बळी ठरले असल्याची नागरिकांची भावना आहे. विकास शिखराकडे झेपावत असलेल्या नागपुरात नियमांचे पालन करत योजनांची अंमलबजावणी करून घेणाºया अधिकाºयांची आवश्यकता आहे. मात्र राजकीय स्वार्थासाठी मुंढे यांना राजकारण्यांनी विरोध केला. यामुळे मुंढे यांचे नव्हे तर नागपूरचेच नुकसान झाले असल्याची भावना एका नागरिकाने ‘सोशल मीडिया’वर व्यक्त केली.

रस्त्यांवर उतरणार नागपूरकर
दरम्यान, तुकाराम मुंढे यांच्यासाठी नागपूरकरदेखील रस्त्यांवर उतरणार आहेत. २७ ऑगस्ट रोजी संविधान चौकात नागरिक एकत्रित येणार असून ‘सोशल मीडिया’वर ‘व्ही सपोर्ट तुकाराम मुंढे’ ही मोहीम सुरू झाली आहे.

आता उद्यापासून ‘नो कोरोना’
‘कोरोना’बाबत मुंढे यांनी केलेल्या कार्याची नागरिकांनी प्रचंड प्रशंसा केली होती. आता त्यांची बदली झाल्यानंतर राजकारण्यांना मोठा दिलासा मिळाला असेल. २४ तासात नागपूर जणू ‘कोरोनामुक्त’च होणार आहे अशा चिमटा काढणाऱ्या भावनादेखील नागपूरकरांनी व्यक्त केल्या.

‘सोशल मीडिया’वर नागरिकांच्या भावना
-डॅशिंग आणि कर्तव्यतत्पर, सामान्य जनतेचा अधिकारी असलेले तुकाराम मुंढे हे खरे ‘वॉरियर’ आहेत. हा सेनापती तंबूत बसून आदेश देत नाही तर प्रत्यक्ष रणांगणावर आघाडीचा योद्धा म्हणून लढतो.

-राजकारण जिंकले प्रशासन हरले! प्रशासनात कर्तबगार, शिस्तबध्द आणि प्रामाणिक लोकांची काही गरज नाही! पुन्हा हेच सिध्द झाले.

-एक खरा अधिकारी या नागपूरला मिळाला होता पण तो पण हिसकावून टाकला. हे शहराचे दुर्दैव आहे.

Web Title: ‘Hats off to Mr. Mundhe’: the sentiments of the masses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.