बारावीच्या मूल्यांकनाला फटका
By Admin | Updated: March 11, 2015 02:04 IST2015-03-11T02:04:22+5:302015-03-11T02:04:22+5:30
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या पूर्ण न झाल्याच्या विरोधात महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ आणि ‘विज्युक्टा’तर्फे ...

बारावीच्या मूल्यांकनाला फटका
नागपूर : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या पूर्ण न झाल्याच्या विरोधात महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ आणि ‘विज्युक्टा’तर्फे (विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशन) पुकारण्यात आलेल्या असहकार आंदोलनास मंगळवारपासून सुरुवात झाली. असहकाराच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या मूल्यांकनाला फटका बसण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी उपराजधानीत केवळ तीन ते चार हजार उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राज्यातील ६० हजार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे दीर्घकालीन प्रश्न प्रलंबित असून सरकारने त्यावर तोडगा काढलेला नाही. मागीलवर्षीदेखील याच मागण्यांवरून संघटनेने पेपर तपासणीच्या कामावर बहिष्कार घातला होता. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्र्यांना याबाबत वारंवार पत्रं पाठविण्यात आली. परंतु त्यांनी संघटनांना साधे चर्चेसाठीदेखील बोलाविले नाही. त्यामुळे असहकार पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार मंगळवारी नागपूर विभागातील या दोन्ही संघटनांचे सदस्य असलेल्या शिक्षकांनी दिवसभरात प्रत्येकी एक या प्रमाणेच उत्तरपत्रिका तपासल्या.
शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची शनिवारी बैठक झाली. परंतु त्यावर सकारात्मक तोडगा समोर आला नाही. असहकारामुळे मूल्यांकनाला मोठा फटका बसू शकतो. शासनाने यावर लवकरात लवकर तोडगा काढला नाही तर समस्या गंभीर होऊ शकते असे शिक्षण विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले.
आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम असून कुठल्याही परिस्थितीत मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे मत ‘विज्युक्टा’चे महासचिव अशोक गव्हाणकर यांनी व्यक्त केले. दरम्यान शुक्रवारी शासनाने शिक्षक संघटनांना परत चर्चेसाठी बोलविले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.(प्रतिनिधी)