हातोड्याने वार करून पत्नीची हत्या
By Admin | Updated: June 1, 2017 02:35 IST2017-06-01T02:35:21+5:302017-06-01T02:35:21+5:30
एका व्यक्तीने हातोड्याने वार करून पत्नीची निर्घृण हत्या केली. ही थरारक घटना जरीपटका परिसरात

हातोड्याने वार करून पत्नीची हत्या
जरीपटका परिसरातील घटना : आरोपी फरार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका व्यक्तीने हातोड्याने वार करून पत्नीची निर्घृण हत्या केली. ही थरारक घटना जरीपटका परिसरात आज बुधवारी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पूनम राकेश गजभिये (२२) रा. मलका कॉलनी, समतानगर असे मृत महिलेचे नाव आहे तर राकेश गजभिये असे आरोपी पतीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राकेश टाईल्स बसविण्याचे ठेके घेतो. दोन वर्षांपूर्वी तो यशोधरानगरात आईवडिलांसोबत राहत होता. यावेळी त्याचे घराशेजारी राहणाऱ्या पूनमसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दोघांच्याही घरून विरोध होता. त्यामुळे त्यांनी पळून जाऊन प्रेमविवाह केला. दोन वर्षे सुखी संसार केल्यानंतर त्यांच्या संसार वेलीवर ‘डेव्हिड नावाचे फूल उमलले.
राकेशला दारूचे व्यसन होते. त्यांच्यात नेहमीच वाद व्हायचा. राकेश तिला मारहाण करायचा. या मारहाणीला कंटाळून ती माहेरी निघून गेली होती. परंतु राकेशने तिला समजावून घरी आणले. मंगळवारी रात्री ९ वाजता राकेश घरी आला. त्यांच्यात पुन्हा वाद झाला. त्याने रागाच्या भरात बेडवर झोपलेल्या पूनमच्या डोक्यावर हातोड्याने वार केले. पूनम रक्ताच्या थारोळ्यात कोसळताच त्याने घरातून पळ काढला.
हे हत्याकांड आज बुधवारी सकाळी उघडकीस आले. परिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना देताच जरीपटका पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी आरोपी पती राकेशविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध घेणे सुरू आहे.
मनीषनगरात पत्नीवर जीवघेणा हल्ला
कौटुंबिक वादातून मनीषनगर येथेसुद्धा एका पतीने आपल्या पत्नीच्या डोक्यात लोखंडी पाईपने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. वीणा कापसे (४०) असे जखमी महिलेचे नाव आहे तर प्रशांत भीमराव कापसे (४५) रा. देवनगर असे आरोपी पतीचे नाव आहे. वीणा कापसे यांच्या मालकीचे मनीषनगर येथे सावी बुटीक आहे. त्यांचा पतीसोबत कौटुंबिक वाद सुरू आहे. बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास वीणा आपल्या बुटीकमध्ये असताना प्रशांत तिथे आला आणि वीणाच्या डोक्यावर लोखंडी पाईपने वार केला. यात ती गंभीर जखमी झाली. सुनिता बडगैय्या (३४) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.