हरदोली पेपर मिलला भीषण आग

By Admin | Updated: May 24, 2015 02:58 IST2015-05-24T02:58:05+5:302015-05-24T02:58:05+5:30

काटोल तालुक्यातील कोंढाळीपासून तीन कि.मी. अंतरावर असलेल्या हरदोली पेपर मिलच्या आवारात ठेवलेल्या खरड्यांनी अचानक शनिवारी सकाळी ११.४५ वाजताच्या सुमारास पेट घेतला.

Hardolie paper mixed gruesome fire | हरदोली पेपर मिलला भीषण आग

हरदोली पेपर मिलला भीषण आग

कोंढाळी : काटोल तालुक्यातील कोंढाळीपासून तीन कि.मी. अंतरावर असलेल्या हरदोली पेपर मिलच्या आवारात ठेवलेल्या खरड्यांनी अचानक शनिवारी सकाळी ११.४५ वाजताच्या सुमारास पेट घेतला. यात अंदाजे १३०० टन खरड्यांची राख झाली. या आगीत प्राणहानी झाली नसली तरी, तीन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे मिलचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार लाखोटिया यांनी सांगितले. पाच तासांच्या प्रयत्नानंतर ही आग पूर्ण नियंत्रणात आली नव्हती.
कोंढाळी - नागपूर महामार्गावरील या पेपर मिलमध्ये ‘क्रॉफ्ट’ पेपरचे उत्पादन केले जाते. येथे रोज १०० टन क्राफ्ट पेपरचे उत्पादन केले जात असून, ही कंपनी क्राफ्ट पेपरसाठी लागणारा कच्चा माल अमेरिका, युरोप व आखाती देशांमधून आयात करते. ही कंपनी कच्चा माल देशांतर्गत बाजारातून १३ रुपये प्रतिकिलो आणि परदेशातून १७ रुपये प्रतिकिलो खरेदी करते. येथे खरड्यांचा ‘पल्प’ तयार करू न त्यापासून क्रॉफ्ट पेपर तयार केला जातो. शनिवारी सकाळी या मिलमध्ये नेहमीप्रमाणे उत्पादन सुरू असताना बॉयलरमागे ठेवण्यात आलेल्या कच्च्या मालाच्या ढिगाऱ्याने पेट घेतला. पाहता-पाहता ही आग पसरत गेली.
खरड्यांनी पेट घेतल्याचे लक्षात येताच कामगारांमध्ये धावपळ सुरू झाली. माहिती मिळताच कोंढाळीचे ठाणेदार प्रदीप लांबट यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. शिवाय, पोलीस नियंत्रण कक्षालाही सूचना देण्यात आली. दुपारी १२ वजताच्या सुमारास याच परिसरात असलेल्या बाजारगाव शिवारातील सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. आग नियंत्रणात येत नसल्याचे लक्षात येताच लगेच नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या चार, काटोल व नरखेड नगर परिषद आणि अ‍ॅटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनीच्या प्रत्येकी एका वाहनाला पाचारण करण्यात आले. एवढेच नव्हे तर कोंढाळीतील दोन टँकरही बोलावण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाच तास अथक प्रयत्न करूनही ही आग पूर्णपणे नियंत्रणात आली नव्हती. सुदैवाने या आगीत कुणीही जखमी झाले नाही. आग विझविण्यासाठी किशोर रेवतकर, बबलू भुरे, राजू बुटे, नसिर, वसंता बालपांडे या तरुणांनीही प्रयत्नांची पराकाष्ठा केली. (वार्ताहर)

Web Title: Hardolie paper mixed gruesome fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.