तक्रार मागे घेण्यासाठी तरुणीचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:08 IST2021-03-23T04:08:48+5:302021-03-23T04:08:48+5:30

नागपूर : चार वर्षांपूर्वी मैत्रिणीला फुटाळा तलावात ढकलून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीने आता ही तक्रार वापस घ्यावी ...

Harassment of a young woman to withdraw a complaint | तक्रार मागे घेण्यासाठी तरुणीचा विनयभंग

तक्रार मागे घेण्यासाठी तरुणीचा विनयभंग

नागपूर : चार वर्षांपूर्वी मैत्रिणीला फुटाळा तलावात ढकलून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीने आता ही तक्रार वापस घ्यावी म्हणून तिच्यामागे तगादा लावला आहे. रविवारी रात्री त्याने तिला धमकी देऊन विनयभंग केला.

तक्रार करणारी तरुणी २३ वर्षांची आहे. ती मानकापूर परिसरात राहते. आरोपीचे नाव सौरभ रामदास बोंबर्डे (वय २५) आहे. तो शिक्षण घेत असून तरुणी खासगी नोकरी करते.

चार वर्षांपूर्वी त्यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध होते. नंतर, त्यांच्यात वितुष्ट आले. त्यामुळे २०१७ मध्ये आरोपी सौरभने तिला फुटाळा तलावाजवळ फिरायला नेऊन पाण्यात ढकलून दिले होते. वेळीच मदत मिळाल्याने तिचा जीव वाचला. यावेळी तिने दिलेल्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी आरोपी सौरभविरुद्ध विनयभंग करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता. काही दिवस शांत राहिल्यानंतर सौरभने तरुणीच्या मागे ती केस मागे घेण्यासाठी तगादा लावला. यासाठी तो तिच्याशी वारंवार संपर्क साधून तिचा पाठलाग करत होता. रविवारी असेच झाले. तिने केस मागे घेण्यास नकार दिल्यामुळे सौरभने तिला अश्लील शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. त्यामुळे तरुणीने मानकापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी विनयभंग करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

---

Web Title: Harassment of a young woman to withdraw a complaint