लाेकमत न्यूज नेटवर्क
कन्हान : नगर पालिका प्रशासनाने अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली बांधकाम ताेडले. ही कारवाई भेदभावपूर्ण असल्याचा आराेप करीत नागरिकांनी पालिका कार्यालयासमाेर साखळी उपाेषणाला सुरुवात केली. प्रशासन सहाव्या दिवशी या उपाेषणाची दखल घेत नसल्याने लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी साेमवारी (दि. २८) पालिका कार्यालयासमाेर अर्धग्नग्न आंदाेलन केले. आठ वेगवेगळ्या मागण्यांसाठी आंदाेलन केले जात असल्याचे आंदाेलकांनी स्पष्ट केले.
पालिका प्रशासनाने शहरातील ३० अतिक्रमणधारकांना नाेटीस बजावल्या. माेरेश्वर खडसे वगळता कुणावरही कारवाई केली नाही. यात पालिका प्रशासनाने त्यांचे अर्धवट बांधलेले घर ताेडले. ही कारवाई अन्यायकारक असल्याचा आराेप करीत माेरेश्वर खडसे यांच्यांसह नागरिकांनी पालिका कार्यालयासमाेर साखळी उपाेषणाला सुरुवात केली. या आंदाेलनाचा साेमवारी सहावा दिवस हाेता. या काळात प्रशासनाने आंदाेलनाची दखल घेतली नाही, असा आराेप करीत या साखळी उपाेषणाच्या समर्थनार्थ काही नागरिकांनी साेमवारी पालिका कार्यालयासमाेर अर्धनग्न आंदाेलन केले. आंदाेलनात माेरेश्वर खडसे, अंबादास खंदारे, कुणाल लोंढे, शक्ती पात्रे, निखिल खडसे सहभागी झाले हाेते. चंद्रशेखर भिमटे, नगरसेवक राजेश यादव व डायनल शेंडे यांनी आंदाेलनाला समर्थन दिले आहे. पालिकचे मुख्याधिकारी बन्नाेरे यांनी उपाेषण मंडपात आंदाेलकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन न दिल्याने चर्चा फिस्कटली, अशी माहिती अंबादास खंडारे यांनी दिली.
...
या आहेत मागण्या
पालिका प्रशासनाने ६ डिसेंबर राेजी ३० अतिक्रमणधारकांना नाेटीस बजावल्या आहेत. त्यांच्यावर अद्याप कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी. पालिकेने पाणीपुरवठ्याचे १३ लाख रुपयांचे बिल दिले आहे, त्याची चाैकशी करावी तसेच दाेषींवर कारवाई करावी. शहराला पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा. नालीवर अतिक्रमण करून शौचालयाचे बांधकाम करण्यात आल्याने त्याची चाैकशी करावी आदी मागण्यांसाठी आंदाेलन केले जात आहे. मागण्या पूर्ण हाेईपर्यंत आंदाेलन सुरू राहणार असल्याचे माेरेश्वर खडसे यांनी सांगितले.