विदर्भ, मराठवाड्यात गारपीट आणि पाऊस
By Admin | Updated: March 11, 2015 01:41 IST2015-03-11T01:41:11+5:302015-03-11T01:41:11+5:30
गारपीट आणि अवकाळी पावसाने राज्यात पुन्हा थैमान घालण्यास सुरूवात केली आहे. गेल्या २४ तासांत विदर्भ आणि मराठवाड्यात

विदर्भ, मराठवाड्यात गारपीट आणि पाऊस
औरंगाबाद /पुणे : गारपीट आणि अवकाळी पावसाने राज्यात पुन्हा थैमान घालण्यास सुरूवात केली आहे. गेल्या २४ तासांत विदर्भ आणि मराठवाड्यात गारपिटीसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. पाऊस पडत असला तरी राज्याचे तापमान चढेच होते.
लक्षव्दीपासून मध्य महाराष्ट्रापर्यंत, उत्तरप्रदेश ते हरियाणा आणि बंगालच्या उपसागरात हवेचे कमी दाबाचे पट्टे सक्रीय आहेत. त्यामुळे बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्रात खेचले जात असून, त्यामुळे राज्यात अवकाळी पाऊस पडत आहे. या स्थितीमुळे ४ दिवसांपासून राज्यावर अवकाळी पावसाचे संकट आहे. सोमवारपासून पावसास सुरूवात झाली. विदर्भात काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला. मंगळवारी सकाळपासून राज्याच्या काही भागांमध्ये पाऊस पडत होता.
आज सकाळी संपलेल्या २४ तासात राज्यात परभणी येथे १२, नागपूर ०़१ आणि अमरावती १ मिमी पावसाची नोंद झाली होती़ आज सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पुणे ०़९, महाबळेश्वर ५ आणि उस्मानाबाद येथे १ मिमी पावसाची नोंद झाली आहे़
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कुळधरण, राशीन, बारडगाव, राक्षसवाडी भागात सोमवारी मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. लिंबू, डाळिंब, केळी या फळबागांचा फुलोरा गळून पडला. काही ठिकाणी काढणी झालेला कडबा शेतातच भिजल्याने काळपट पडला आहे. कांदा, गव्हालाही फटका बसला.
खान्देशात मंगळवारी नंदुरबार, जळगाव जिल्ह्याला अवकाळीने तडाखा दिला.