उपराजधानीत चोरट्यांचा हैदोस
By Admin | Updated: November 18, 2015 03:06 IST2015-11-18T03:06:21+5:302015-11-18T03:06:21+5:30
उपराजधानीत चोरट्यांचा हैदोस सुरू असून, बेलगाम चोरट्यांनी कोराडी, एमआयडीसी आणि अजनीत घरफोडी केली तर, वाडी आणि गणेशपेठ....

उपराजधानीत चोरट्यांचा हैदोस
कोराडी, एमआयडीसी, अजनीत घरफोडी : वाडी, गणेशपेठमध्ये चोरी
नागपूर : उपराजधानीत चोरट्यांचा हैदोस सुरू असून, बेलगाम चोरट्यांनी कोराडी, एमआयडीसी आणि अजनीत घरफोडी केली तर, वाडी आणि गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी करून रोख तसेच दागिन्यांसह लाखोंचा ऐवज लंपास केला.
कोराडीतील विद्यानगरात राहाणारे नरेश विजयराव कनेरकर (वय २९) दिवाळीच्या निमित्ताने आपल्या मूळगावी बैतूलला (मध्यप्रदेश) गेले होते. सोमवारी सायंकाळी त्यांच्या दाराचे कुलूप तुटलेले दिसल्यामुळे शेजाऱ्यांनी कनेरकर यांना फोनवरून माहिती दिली. त्यामुळे ते घरी परतले. चोरट्यांनी त्यांच्या घरातून रोख २० हजार आणि सोन्याचांदीचे दागिने असा एकूण १ लाख, ८६ हजारांचा ऐवज लंपास केल्याचे स्पष्ट झाले. कनेरकर यांच्या तक्रारीवरून कोराडी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला.
एमआयडीसीतील लोकमान्य नगरात अनिल मदनलाल शर्मा (वय ५२) यांच्याकडे सुद्धा १४ ते १६ नोव्हेंबरच्या दरम्यान घरफोडी झाली. शर्मा परिवारातील सदस्य अमरावतीला गेले होते. चोरट्यांनी त्यांच्या दाराचे कुलूप तोडले आणि कपाटातील १ लाख, ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे बिस्कीट चोरून नेले. शर्मा यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
नरेंद्रनगरातील बालपांडे लेआऊटमध्येही सोमवारी सकाळी घरफोडीची घटना उघडकीस आली. नेहा मोहित काश्यप (वय ३०) यांचे वडील आपल्या बालपांडे लेआऊटमधील घराच्या दाराला कुलूप लावून मुंबईत राहणाऱ्या मुलाच्या भेटीला गेले आहे. ही संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या दाराचे कुलूप तोडून कपाटातील ७२ हजारांची रोकड लंपास केली. काश्यप यांच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी घरफोडीची नोंद केली. (प्रतिनिधी)
वाडीत दारूचे गोदाम फोडले
दारूचे गोदाम फोडून चोरट्यांनी २ लाख ३७ हजारांच्या दारूच्या बाटल्या लंपास केल्या. सोमवारी सकाळी ही चोरीची घटना उघडकीस आली. लावा खडगाव मार्गावर प्रीमियर लिकर इंडियाचे गोदाम आहे. चोरट्यांनी १४ ते १६ नोव्हेंबरच्या कालावधीत गोदामाच्या शटरचे कुलूप तोडले. आतमध्ये ठेवलेल्या ब्लेंडर प्राईड व्हीस्की, व्होडका, इम्पेरियल ब्ल्यू व्हीस्की आदी २ लाख, ३७ हजार ७०० रुपयांचे मद्य लंपास केले. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर देवीदास बापूराव वंजारी (वय ५५) यांनी वाडी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.