कुख्यात भुल्लर टोळीचा हैदोस
By Admin | Updated: January 26, 2016 03:31 IST2016-01-26T03:31:51+5:302016-01-26T03:31:51+5:30
महिनाभरापूर्वीच कारागृहातून बाहेर आलेल्या कुख्यात भुल्लर टोळीने शहरातील व्यावसायिकांचे अपहरण करून

कुख्यात भुल्लर टोळीचा हैदोस
नागपूर : महिनाभरापूर्वीच कारागृहातून बाहेर आलेल्या कुख्यात भुल्लर टोळीने शहरातील व्यावसायिकांचे अपहरण करून त्यांच्याकडून खंडणी वसुलीचा सपाटा लावला आहे. खंडणीचा त्रास असह्य झाल्यामुळे दोन व्यापाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार केल्याने ही खळबळजनक माहिती उघड झाली. खुनाचा प्रयत्न, अपहरण, खंडणी वसुली, हाणामारी असे अनेक गुन्हे या टोळीवर दाखल असून, भुल्लर टोळीच्या गुंडांची उत्तर नागपुरात प्रचंड दहशत आहे. मार्चमध्ये या टोळीचे गुंड कारागृहात पोहोचले. महिनाभरापूर्वीच हे गुंड जामिनावर बाहेर आले आणि त्यांनी पुन्हा भाईगिरी सुरू केली.
राजकिरण ऊर्फ छोटू केवलराम हरियानी (वय ३७) याने त्याचा मित्र रवी साधवानीची इंडिगो कार २५ हजारात १० टक्के व्याजाने गहाण ठेवली होती. त्याचे व्याजासकट पैसे दिल्यानंतर आरोपी हरविंदरसिंग ऊर्फ गोल्डी कुलवंतसिंग भुल्लर (वय २९) आणि जुजारसिंग कश्मीरसिंग ढिल्लों (वय २४, दोघेही रा. पाटणकर चौकाजवळ जरीपटका) यांनी छोटू हरियानीला १३ ते २२ जानेवारीदरम्यान पाटणकर चौकाजवळ, मंगळवारी बाजार मैदान येथे बोलवले. त्याला लोखंडी रॉडचा धाक दाखवून हातातील चांदीचे बे्रसलेट दाखवले. यासारखे सोन्याचे ब्रेसलेट पाहीजे असे म्हणून ठार मारण्याची धमकी देऊन पाच लाखांची खंडणी मागितली. आरोपींच्या दहशतीमुळे हरियानीने त्यांना ८० हजार रुपये दिले.
दुसरे प्रकरण ५ ते १३ जानेवारीदरम्यानचे आहे. कुख्यात हरविंदरसिंग ऊर्फ गोल्डी कुलवंतसिंग भुल्लर आणि हरजिंदरसिंग ऊर्फ पिंटू भुल्लर (वय २४) या दोघांनी महेश ऊर्फ जितेंद्र टोपनदास लालवाणी (वय ३५, रा. हेमू कलानी चौक) याचे दीड लाखाच्या खंडणीसाठी अपहरण केले. त्याला आपल्या घरामागच्या मैदानात नेऊन त्यास बेदम मारहाण केली. खंडणी न दिल्यास ठार मारू, अशीही धमकी दिली. लालवाणीने भीतीपोटी ५० हजार रुपये देऊन त्यावेळी स्वत:ची सुटका करून घेतली.
खंडणीची उर्वरित रक्कम वसूल करण्यासाठी भुल्लर आणि ढिल्लों तसेच त्यांच्या गुंडांनी हरियानीचा छळ सुरूच ठेवला. सोबतच अनेक व्यापाऱ्यांकडून भुल्लर टोळी अशाच प्रकारे खंडणी वसूल करू लागल्याने व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर, काही व्यापाऱ्यांनी भुल्लर टोळीला मदत करणाऱ्या दुसऱ्या एका टोळीप्रमुखाशी संपर्क साधला; मात्र त्यानेही खंडणीची मागणी केली. दोन्हीकडून कोंडी होत असल्याचे पाहून व्यापाऱ्यांनी भुल्लर टोळीविरुद्ध जरीपटका पोलिसांकडे तक्रार नोंदविण्यासाठी धाव घेतली. (प्रतिनिधी)
आयुक्तांनी घेतली गंभीर दखल
३१ मार्च २०१५ ला दिवसाढवळ्या भुल्लर टोळीने प्रतिस्पर्धी लिटिल सरदारच्या साथीदारांवर फायरिंग केल्यामुळे भुल्लर टोळीवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यांच्याविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाई करून त्यांना कारागृहात डांबण्यात आले. महिनाभरापूर्वीच ते कारागृहातून जामिनावर बाहेर आले आणि त्यांनी व्यापाऱ्यांचे अपहरण करून, मारहाण करून खंडणी वसुलीचा सपाटा लावल्याचे कळताच पोलीस आयुक्तांनी त्याची गांभीर्याने दखल घेतली. त्यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार जरीपटका पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हे दाखल करून उपरोक्त आरोपींना अटक केली.
‘कलेर’ची कारागिरी
भुल्लर टोळीचे पाप झाकण्यासाठी कुख्यात गोल्डी कलेर पडद्यामागून काम करतो. तो एका खुनातील आरोपी असून, बनावट कागदपत्रांच्या आधारे तो विदेशात पळून गेला होता. भुल्लर टोळीवर गुन्हे दाखल होत असल्याची माहिती कळताच त्याने प्रकरणात समेट घडविण्यासाठी रविवारी दुपारपासून धावपळ चालविली. काहींना समज दिली तर काहींना धाकही दाखविल्याची चर्चा आहे. पोलीस कलेरवर कोणती कारवाई करतात, त्याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.