एच. बी. टाऊनमधील शीतला माता मंदिर पाडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 12:30 AM2019-08-20T00:30:29+5:302019-08-20T00:32:10+5:30

शीतला माता मंदिर मात्र लवकरच पाडण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेने सोमवारी न्यायालयाला दोन आठवड्याचा वेळ मागून घेतला.

H. B. Town Shitla Mata Mandir will demolish | एच. बी. टाऊनमधील शीतला माता मंदिर पाडणार

एच. बी. टाऊनमधील शीतला माता मंदिर पाडणार

Next
ठळक मुद्देमनपाची हायकोर्टात माहिती : दोन आठवड्याचा वेळ मंजूर

लोकमत  न्यूज  नेटवर्क 
नागपूर : महापालिकेने त्यांच्या अधिकारक्षेत्रातील २० पैकी १८ अनधिकृत धार्मिकस्थळे पाडली असून आता केवळ खानखोजेनगर येथील महाकाली मंदिर व एच. बी. टाऊन येथील शीतला माता मंदिर शिल्लक आहे. महाकाली मंदिर पाडण्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची ९ सप्टेंबरपर्यंत स्थगिती आहे. त्यामुळे या मंदिरावर न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत कारवाई करण्यात येणार नाही. शीतला माता मंदिर मात्र लवकरच पाडण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेने सोमवारी न्यायालयाला दोन आठवड्याचा वेळ मागून घेतला.
यासंदर्भात न्यायालयात मनोहर खोरगडे व डॉ. गजानन झाडे यांची जनहित याचिका प्रलंबित आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. १९ सप्टेंबर २०१८ रोजी न्यायालयाने २९ सप्टेंबर २००९ पूर्वी बांधण्यात आलेल्या अनधिकृत धार्मिकस्थळांचे नव्याने सर्वेक्षण करून त्यांचे ५ मे २०११ रोजीच्या शासन निर्णयानुसार ‘अ’ व ‘ब’ गटामध्ये वर्गीकरण करण्याचा आदेश महापालिकास्तरीय समितीला दिला होता. पाडणे आवश्यक असलेल्या अनधिकृत धार्मिकस्थळांचा ‘ब’ गटात समावेश करायचा होता. त्यानुसार, महापालिकास्तरीय समितीने सर्वेक्षण व अन्य कायदेशीर प्रक्रियेची अंमलबजावणी केल्यानंतर १२१ अनधिकृत धार्मिकस्थळांना ‘ब’ गटात टाकले होते. त्यापैकी नासुप्र व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्षेत्रात प्रत्येकी २५, रेल्वेच्या २२, महापालिकेच्या २०, राज्य सरकारच्या १४, पीडब्ल्यूडीच्या ०६, डिफेन्सच्या ०४, राष्ट्रसंत तुक डोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ०३ तर, म्हाडा व महावितरणच्या क्षेत्रात प्रत्येकी ०१ अनधिकृत धार्मिकस्थळाचा समावेश होता. त्यापैकी मोजकीच अनधिकृत धार्मिकस्थळे आता शिल्लक असून इतर सर्व अनधिकृत धार्मिकस्थळे पाडण्यात आली आहेत. याचिकाकर्त्यांच्यावतीने अ‍ॅड. फिरदोस मिर्झा तर, महापालिकेतर्फे अ‍ॅड. सुधीर पुराणिक यांनी कामकाज पाहिले.

Web Title: H. B. Town Shitla Mata Mandir will demolish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.