ग्वालबन्सीच्या साथीदाराला जामीन

By Admin | Updated: June 11, 2017 02:52 IST2017-06-11T02:52:05+5:302017-06-11T02:52:05+5:30

गोरेवाडा येथील ख्वाजा गरीब नवाज सोसायटीतील भूखंड हडपून मालकाला स्वत:च्या भूखंडाच्या ठिकाणी येण्यास मज्जाव करून जातीवाचक शिवीगाळ ...

GwalBansy's partner will get bail | ग्वालबन्सीच्या साथीदाराला जामीन

ग्वालबन्सीच्या साथीदाराला जामीन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गोरेवाडा येथील ख्वाजा गरीब नवाज सोसायटीतील भूखंड हडपून मालकाला स्वत:च्या भूखंडाच्या ठिकाणी येण्यास मज्जाव करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी भूमाफिया दिलीप ग्वालबन्सी याच्या साथीदाराला विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ओ. पी. जयस्वाल यांच्या न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला.
दयाशंकर जनार्दन पांडे (४४) रा. डहाके ले-आऊट गोधनी, असे आरोपीचे नाव आहे.
गोधनी रोड सुमितनगर येथील रहिवासी मनोहर महादेवराव देऊळकर (६०) यांचा तक्रारीवरून मानकापूर पोलीस ठाण्यात दिलीप ग्वालबन्सी, दयाशंकर पांडे, त्याची पत्नी निर्मला पांडे आणि एका अनोळखी महिलेविरुद्ध भादंविच्या ३४१, ३५२, ५०४, ५०६, ३४ आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३(१)(जी)(आर)(एस), ३(२)(व्हीए) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने दयाशंकर पांडे आणि त्याची पत्नी निर्मला पांडे (४०) यांना अटक केली होती.
त्यापैकी न्यायालयाने निर्मला पांडे यांना सशर्त जामीन मंजूर केला होता तर दयाशंकर पांडेला ८ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता.
गुरुवारी त्याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावताच आरोपीच्या वकिलाने जामीन अर्ज दाखल केला होता. जामीन अर्जावर सुनावणी होऊन न्यायालयाने दयाशंकर पांडे याला २५ हजाराच्या जामिनावर सोडले. न्यायालयात आरोपीच्यावतीने अ‍ॅड. चेतन ठाकूर यांनी काम पाहिले.

Web Title: GwalBansy's partner will get bail