मालेवाडा येथे ठिकठीकाणी वाहते ‘गटारगंगा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:09 IST2021-07-31T04:09:05+5:302021-07-31T04:09:05+5:30
मालेवाडा - ग्रामपंचायत म्हणजे ग्राम विकासाचा कणा. त्यामुळे या ना त्या कारणावरुन ग्रामपंचायतीच्या कारभारावर सतत प्रश्न उठतात. मात्र ग्रामपंचायत ...

मालेवाडा येथे ठिकठीकाणी वाहते ‘गटारगंगा’
मालेवाडा - ग्रामपंचायत म्हणजे ग्राम विकासाचा कणा. त्यामुळे या ना त्या कारणावरुन ग्रामपंचायतीच्या कारभारावर सतत प्रश्न उठतात. मात्र ग्रामपंचायत संसर्गजन्य आजाराच्या दृष्टीने लोकहितपयोगी आवाहन करत असेल तर, त्याला ग्रामस्थांची साथ अपेक्षित आहे. मालेवाडा ग्रामपंचायत मात्र आवाहन करत सूचना देत थकून गेली. मात्र काही हेकेखोर अद्यापही ऐकण्याच्या मानसिकतेत नाही. गावात सांडपाण्याची गटारगंगा वाहत आहे. डेंग्यूचे रुग्णही आढळत आहे.
मालेवाडा येथे दोन चिमुकले डेंग्यू पॉझिटीव्ह आढळलेत. त्यामुळे ग्रामपंचायतीने लागलीच गावात स्वच्छतेची मोहीम राबवित, फॉगिंग मशिनने एक नव्हे दोन वेळा धुरळणी केली. अंतर्गत रस्त्यांवर सांडपाण्याची गटारगंगा वाहत आहे. कुठे खड्डे घाण पाण्याने तुंबले आहे. त्यामुळे मच्छरांची पैदास वाढत आहे. याची दखल घेत ग्रामपंचायतीने अशा १७ जाणांना नोटीस बजावून सांडपाण्याची पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्यात. त्यानंतरही ते ऐकण्याच्या मानसिकतेत नाही. गतवर्षी सुद्धा याच नागरिकांना एक नव्हे दोनवेळा नोटीस देण्यात आल्यात. त्यानंतरही न ऐकणाऱ्या ग्रामस्थांवर पोलीस कारवाई करण्याचा ग्रामपंचायतीने पवित्रा घेतला. मात्र त्यावरही राजकीय पडसाद पडल्याने कारवाई तेथेच थांबली. ही गटारगंगा गावातील रस्त्यांवर अद्यापही वाहत आहे. आता डेंग्यूचे रुग्ण आढळल्यामुळे ग्रामस्थ भयभित झाले आहे. त्यामुळे गावाच्या सुदृढ आरोग्याकरिता ही गटारगंगा थांबविणे आवश्यक आहे.
---
त्यांचाच घरी डेंग्यूचे रुग्ण
ज्यांच्या घरातील सांडपाण्याची गटारगंगा गावातील अंतर्गत रस्त्यांवर वाहत आहे. त्यांच्यापैकीच काही घरी दोन डेंग्यूचे रुग्ण आढळल्याचे बोलल्या जात आहे. रुग्ण आढळताच आरोग्य विभागाने याची तातडीने दखल घेणे आवश्यक होते. मात्र येथील आरोग्य सेवकाचा चेहरा गत कित्येक दिवसापासून मालेवाडावासीयांना दिसलेला नाही.
--
गावात डेंग्यूचे दोन रुग्ण आढळल्याने आम्ही स्वच्छतेला पहिले स्थान दिले आहे. फॉगिंग मशीनने धुरळणी सुरु आहे. घरगुती सांडपाणी रस्त्यावर वाहून जाणाऱ्या १७ जणांना नोटीस दिल्या आहे. नोटीसला न ऐकणाऱ्यांवर पोलीस कारवाई करण्याचे विचाराधीन आहे.
-सुनील तायवाडे, ग्रामसेवक, मालेवाडा