मुंबईहून लागली गुप्ताची फिल्डिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:11 IST2021-08-12T04:11:38+5:302021-08-12T04:11:38+5:30
दोन महिन्यापासून गुप्ताविरुद्ध सुरू होती विशेष मोहीम एसीबीसह, सीबीआयकडेही तक्रार नरेश डोंगरे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - लाचखोरी अन् ...

मुंबईहून लागली गुप्ताची फिल्डिंग
दोन महिन्यापासून गुप्ताविरुद्ध सुरू होती विशेष मोहीम
एसीबीसह, सीबीआयकडेही तक्रार
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - लाचखोरी अन् मग्रुरीमुुळे अनेक कंत्राटदारांच्या रोषाचे बळी ठरलेल्या रमेशकुमार गुप्ता नामक अधिकाऱ्याला अखेर आज मंगळवारी एसीबीच्या सापळ्यात अडकावे लागले. गुप्ताला कारवाईत अडकवण्यासाठी दोन महिन्यापासून फिल्डिंग लावण्यात आली होती अन् त्यासाठी मुख्यमंत्री एसीबीचे महासंचालकच नव्हे तर सीबीआयकडेही कंत्राटदारांनी तक्रारी केल्या होत्या.
नागपूर जिल्हा परिषदेत जिल्हा जलसंधारण अधिकारी असलेले गुप्ता त्यांच्या विशिष्ट कार्यपद्धतीमुळे वादग्रस्त ठरले होते. संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, लाचेशिवाय ते कोणत्याच कामाला हात लावत नव्हते. उजर करणाऱ्या कंत्राटदारांना ते काळ्या यादीत टाकण्याची धमकी द्यायचे. ई - निविदा प्रक्रियेत भाग घेण्यासाठी त्यांनी कंत्राटदारांना त्यांचे ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक केले होते. त्यामुळे त्यांच्याच मर्जीतील कंत्राटदारांना काम मिळायचे. किरकोळ कारणामुळे ते निविदा प्रक्रियेतून कोणत्याही कंत्राटदाराला बाद करायचे. उजर केल्यास कंत्राटदारांशी उर्मट वर्तन करायचे. पाहिजे त्या नेत्याकडे जा, कोणत्याही अधिकाऱ्यांकडे तक्रार करा. मी सर्वांना खिशात ठेवतो. सर्वांना बरोबर घेऊन चालतो, त्यामुळे माझे कुणी काहीच बिघडवू शकत नाही, अशी भाषा वापरायचे. त्यांचे हे वर्तन अनेक कंत्राटदारांना दुखावणारे होते. त्यामुळे दुखावलेल्यांनी गुप्तांची फिल्डिंग टाईट केली होती.
त्याचमुळे कंत्राटदार आणि अभियंता असोसिएशनने मुख्यमंत्री, जलसंधारण मंत्री, खासदार, आमदार, विविध पक्षांचे जिल्हाप्रमुख, एसीबी महासंचालक आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडेही २४ जून २०२१ ला लिहिलेल्या पत्रातून तक्रार केली होती.
---
... म्हणून स्थानिक अधिकारी अनभिज्ञ
एसीबीकडे जा की सीबीआयकडे, मला काही फरक पडत नाही, अशी गुप्ताची भाषा होती. विशेष म्हणजे, वारंवार तक्रारी करूनही त्याचे काहीच बिघडत नसल्याने कंत्राटदारांना गुप्ताच्या भाषेचा अर्थ कळत होता. त्यामुळे त्याने लाच मागितल्यानंतर त्याची तक्रार करताना ‘ऑन रेकॉर्ड’ पुरावा देण्यात आला. मुंबईतून सूत्रे हलविण्यात आली. नागपूरच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई झाल्यास गुप्ताला आधीच माहिती पडेल, असा संशयही घेण्यात येत होता. त्याचमुळे गुप्तावर एसीबीच्या अमरावती युनिटकडून अत्यंत गोपनीयरीत्या कारवाई करून घेण्यात आली.
---