दोषींवर कारवाई करणार
By Admin | Updated: April 29, 2016 02:51 IST2016-04-29T02:51:21+5:302016-04-29T02:51:21+5:30
काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे आणि नरेंद्र जिचकार यांच्यात मंगळवार, २६ एप्रिलला विमानतळावरील सिक्युरिटी होल्ड एरियात शाब्दीक चकमक

दोषींवर कारवाई करणार
विमानतळ प्रशासनाची भूमिका : ठाकरे-जिचकार यांच्यातील वाद
नागपूर : काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे आणि नरेंद्र जिचकार यांच्यात मंगळवार, २६ एप्रिलला विमानतळावरील सिक्युरिटी होल्ड एरियात शाब्दीक चकमक वा माराहाण झाल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद आहे. यातील फुटेजच्या आधारे दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने लोकमतशी बोलताना दिली.
या घटनेची माहिती सोनेगांव पोलिसांना दिली असून सीआयएसएफचे डेप्युटी कमांडर गुरुजितसिंग संयुक्तरीत्या चौकशी करीत आहेत. दोन्ही नेते हमरीतुमरीवर आले तेव्हा प्रवाशांनी त्यांना बाजूला केले. विमानतळावरील ७० टक्के कर्मचारी दोन्ही नेत्यांना ओळखतात. त्यामुळे त्यांनी दोघांमधील वाद सोडविला. त्यानंतर दोन्ही नेते विमानाने मुंबईला रवाना झाले.
सीसीटीव्हीमध्ये दोन्ही नेत्यांचे अशोभनीय वर्तन दिसून येत आहे. दोघांमध्ये काय संभाषण झाले, हे सीसीटीव्हीत ऐकू येणार नाही. पण मारहाणीची घटना स्पष्ट दिसून येत आहे. बोर्डिंग पास घेतल्यानंतर सिक्युरिटी होल्ड एरियात हजर असलेल्या प्रवाशांनी घटनेची तक्रार नोंदविली नाही. अशी घटना पहिल्यांदाच घडल्याची माहिती विमानतळाचे टर्मिनल व्यवस्थापक अमित कासटवार यांनी दिली. फुटेजच्या आधारे दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)