गुढीपाडव्याला १०० कोटींची उलाढाल!

By Admin | Updated: March 22, 2015 02:39 IST2015-03-22T02:39:57+5:302015-03-22T02:39:57+5:30

साडेतीन मुहूर्तापैकी एक समजल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याला बाजारात प्रचंड उत्साह होता. ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली.

Gudipaddha gets turnover of 100 crores! | गुढीपाडव्याला १०० कोटींची उलाढाल!

गुढीपाडव्याला १०० कोटींची उलाढाल!

नागपूर : साडेतीन मुहूर्तापैकी एक समजल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याला बाजारात प्रचंड उत्साह होता. ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. सोने-चांदी, आॅटोमोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठांमध्ये ग्राहकांनी कुटुंबीयांसह मोठ्या प्रमाणात खरेदी केली. गुढीपाडव्याला सर्व बाजारपेठांमध्ये जवळपास १०० कोटींची उलाढाल झाल्याची माहिती आहे.घरोघरी गुढ्या उभारून मराठी नववर्षाचा आरंभ करण्याच्या उत्साहाला चैतन्याचे तोरण लागले होते. गुढीपाडव्यानिमित्त बाजारपेठ सजली होती. व्यापाऱ्यांनी शोरूमही पारंपरिक पद्धतीने सजविल्या होत्या.
विशेष आॅफरचा फायदा
मुहूर्ताला सोनेखरेदीला येणाऱ्या ग्राहकांचे स्वागत पारंपरिक पद्धतीने करण्यात सराफ व्यावसायिक दंग होते. घर खरेदीचे नियोजन करणाऱ्या ग्राहकांसाठी बुकिंगवर आकर्षक आॅफर्स होत्या. फ्लॅट, प्लॉटसह एलसीडी टीव्ही, मायक्रोवेव्ह ओव्हन, इंडक्शन शेगडी, लॅपटॉप आदींवर केवळ गुढीपाडव्यापर्यंतच आॅफर होत्या.
मारुती, टाटा, टोयोटा, आॅडी, जनरल मोटर्स, हुंडई, रेनॉल्ट, फोर्ड, अशोक लेलँड या कंपनीच्या प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांवर आकर्षक सूट होती. मुहूर्तावर दुचाकी वाहनांची डिलेव्हरी ग्राहकांना मिळेल, अशी व्यवस्था शोरूमतर्फे करण्यात आली होती. टीव्हीएस बाईक व स्कूटर, होंडा, बजाज, यामाहा, बजाज, हिरो या कंपन्यांच्या शोरूममध्ये विशेष योजना होत्या. याशिवाय तोशिबा, एलजी, सोनी, सॅमसंग, इलेक्ट्रोलक्स, व्होल्टास या कंपन्याची उपकरणे खरेदीवर ग्राहकांचा भर दिसून आला. याशिवाय विविध कंपन्यांच्या लॅपटॉप खरेदीसाठी युवकांची गर्दी दिसून आली.
५०० फ्लॅट आणि प्लॉटचे वितरण
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अनेकांनी बुक केलेल्या फ्लॅट आणि प्लॉटचा ताबा देण्यात आला. या मुहूर्तावर अनेक बिल्डर्स आणि डेव्हलपर्सनी विशेष समारंभाचे आयोजन केले. यादिवशी ५०० पेक्षा जास्त फ्लॅट आणि प्लॉटचे वितरण करण्यात आले.
आधी बुकिंग, गुढीपाडव्याला खरेदी
मुहूर्तावर खरेदीसाठी अनेकांनी आवडत्या वस्तूचे बुकिंग आधीच केले होते. मात्र वस्तू गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घरी नेली.
इलेक्ट्रॉनिक्स बाजारात उत्साह
सर्व इलेक्ट्रॉनिक्स शोरूममध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते. काहींनी आधीच बुकिंग केलेल्या वस्तू घरी नेल्या तर काहींनी कुटुंबीयांसह शोरूममध्ये येऊन खरेदी केली.
आॅटोमोबाईल्स शोरूममध्ये गर्दी
अनेकांनी पूर्वीच बुकिंग केलेली दुचाकी आणि चारचाकी वाहने विधिवत पूजा करून घरी नेली. सर्व कंपन्यांच्या दीड हजारांपेक्षा जास्त दुचाकी वाहनांची डिलेव्हरी आज देण्यात आली. याशिवाय मारुती, टाटा, महिन्द्र या आघाडीच्या कंपन्यांसह अन्य कंपन्यांच्या शोरूममधून ५०० पेक्षा जास्त चारचाकी वाहनांची विक्री झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Gudipaddha gets turnover of 100 crores!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.