बंद यंत्रांची पालकमंत्र्यांकडून दखल
By Admin | Updated: September 8, 2015 05:27 IST2015-09-08T05:27:40+5:302015-09-08T05:27:40+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) कोट्यवधीची महत्त्वाची यंत्रे उपलब्ध असताना ते

बंद यंत्रांची पालकमंत्र्यांकडून दखल
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) कोट्यवधीची महत्त्वाची यंत्रे उपलब्ध असताना ते हाताळणारे तंत्रज्ञच नसल्याने ती धूळखात पडली आहेत.
परिणामी गोरगरीब रुग्णांना पदरमोड करून ऐनवेळी खासगी केंद्रामध्ये धाव घ्यावी लागत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने ५ सप्टेंबरच्या अंकात ‘तंत्रज्ञाअभावी महागडी उपकरणे धूळखात’ या मथळ्याखाली प्रसिद्ध केले होते. याची दखल पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली असून तत्काळ कारवाईचे निर्देश दिले आहेत.
मेडिकलमध्ये रुग्णांच्या आजाराचे तत्काळ निदान व्हावे, चांगले उपचार मिळावे म्हणून शासन दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उपकरणे उपलब्ध करून देते. विशेष म्हणजे, रुग्णालय प्रशासन व शासनही यंत्र खरेदीसाठी बरीच उत्सुकता दाखविते, परंतु ते हाताळण्यासाठी तंत्रज्ञच देत नाही. त्याच्या देखभालीचा खर्च देत नाही. धक्कादायक म्हणजे, संबंधित विभागांच्या डॉक्टरांना त्याचे प्रशिक्षण देत नाही.
केवळ यंत्र लादून स्वत:ची पाट थोपटते. हे प्रकार अलिकडच्या काळात वाढले आहे. विशेष म्हणजे, मेडिकलमधील ईएमजी, एनसीव्ही, सीपीटीएस यासारखे अनेक यंत्र धूळखात पडले आहेत. मेंदूमधील विद्युत लहरींच्या हालचाली समजण्यासाठी ईईजी (इलेक्ट्रो एन्सेफॅलोग्रॅम) यंत्र चार वर्षांपासून सायकॅट्रिक विभागात बंद स्थितीत आहे.
२०११ मध्ये तंत्रज्ञाची बदली झाल्यापासून हे यंत्र कुलुपात बंद पडले ते आजही तसेच आहे. परिणामी, मेंदूच्या वेगवेगळ्या भागांत दुखापत झाली किंवा रक्तस्राव झालेल्या रुग्णांना, एपिलेप्सीचे निदान करणाऱ्या रुग्णांना बाहेरून ईईजी काढावा लागत आहे. या संदर्भाचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच मेडिकल प्रशासनामध्ये खळबळ उडाली. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी स्वत:हून याची दखल घेत सायकॅट्रिक विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत टिपले यांच्याशी बोलून ‘ईईजी’ मशीनविषयी माहिती घेतली. डॉ. टिपले यांनी तंत्रज्ञाच्या मागणीचा प्रस्तावही पाठविला. पालकमंत्री बावनकुळे यांनीही या वृत्ताची दखल घेत चौकशी करून, कारवाई करण्याचे व अहवाल सादर करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय व मेडिकल यांना दिले.
खुद्द पालकमंत्र्यांनी याची दखल घेतल्याने बंद पडलेली महत्त्वाची यंत्रे सुरू होणार की नाही याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)