स्वतंत्र विदर्भ राज्याच्या भूमिकेवर पालकमंत्री ठाम
By Admin | Updated: August 26, 2014 00:58 IST2014-08-26T00:58:22+5:302014-08-26T00:58:22+5:30
स्वतंत्र राज्याबाबत काँग्रेसने अद्याप त्यांची भूमिका स्पष्ट केली नसली तरी राज्यातील आघाडी सरकारमधील काँग्रेसचे मंत्री व नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी मात्र ते स्वतंत्र विदर्भाच्या मागणीवर

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या भूमिकेवर पालकमंत्री ठाम
नागपूर: स्वतंत्र राज्याबाबत काँग्रेसने अद्याप त्यांची भूमिका स्पष्ट केली नसली तरी राज्यातील आघाडी सरकारमधील काँग्रेसचे मंत्री व नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी मात्र ते स्वतंत्र विदर्भाच्या मागणीवर ठाम असल्याचे येथे स्पष्ट केले.
नागपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे सोमवारी आयोजित ‘वार्तालाप’ कार्यक्रमात ते बोलत होते. जोपर्यंत विदर्भ राज्य होत नाही तोपर्यंत विदर्भाचा विकास होणार नाही, असे आपल्याला वाटते, असे ते म्हणाले. सरकारी नोकऱ्यांमध्ये विदर्भाच्या तरुणांना संधी मिळत नसल्याने विदर्भासाठी स्वतंत्र निवड मंडळ असावे, असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना दिला होता, असे त्यांनी स्पष्ट केले. भाजपने या मुद्दावर दुट्टपी भूमिका घेतली, असा आरोप त्यांनी केला. नागपूरचे पालकमंत्री म्हणून काम करण्यासाठी अत्यल्प वेळ मिळाला असला तरी तो वेळही सत्कारणी घालविण्याचे प्रयत्न आहेत. नागपूरला जागतिक दर्जाचे शहर बनविण्यासाठी प्रयत्न करणार, शहरातील विविध प्रश्न आहे ते मार्गी लावणार, त्यात कायदा व सुव्यवस्था, सिटी सर्व्हे, चौका चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, वीज ग्राहकांच्या समस्या आदींचा समावेश आहे. बुद्धीस्ट थिम पार्क उभारून आंतरराष्ट्रीय पर्यटकांना नागपूरकडे वळविण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. दिलेल्या सूचनांचे अधिकाऱ्यांनी पालन न केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल प्रसंगी उपोषणालाही बसू, असा इशाराही दिला.
रोहयो आणि जलसंधारण खाते हे तुलनेने कमी महत्त्वाचे मानले जात होते. मात्र या खात्याचे काम माझ्याकडे (राऊत यांच्याकडे) सोपवल्यावर अनेक विकासाची कामे सुरू केली. रोहयो खात्याचे बजेट ३५० कोटींहून १६०० कोटींवर तर जलसंधारण खात्याचे बजेट ५० कोटींहून १२०० कोटीपर्यंत वाढविण्यात आले,असे त्यांनी स्पष्ट केले.
नागपूरच्या विकासाठी काँग्रेसने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली. मात्र महापालिकेत भाजपची सत्ता आल्यावर मात्र शहराचे वाटोळे झाले. रस्त्यावर खड्डे पडले, ते बुजविण्यासाठी त्यांच्याकडे निधी नाही,असा आरोपही त्यांनी केला.विकासाच्या कामात राजकारण आणू नये, काँग्रेसच्या काळातील मेट्रो प्रकल्पाला चालना मिळाली त्याचे श्रेय इतर पक्षांनी घेऊ नये, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.
यावेळी पत्रकार भवन विश्वस्त मंडळाचे प्रदीपकुमार मैत्र, शिरीष बोरकर, श्रमिक पत्रकार संघाचे अनुपम सोनी व काँग्रेस नेते जयप्रकाश गुप्ता उपस्थित होते. (प्रतिनिधी)