ओसीडब्ल्यूच्या कामावर पालकमंत्री नाराज
By Admin | Updated: November 11, 2015 02:27 IST2015-11-11T02:27:05+5:302015-11-11T02:27:05+5:30
मागील दोन महिन्यांपूर्वी पाणी पुरवठा करणाऱ्या टॅँकर चालकाने हेमंत बंगाले (वय २० वर्षे) या तरुणाला गंभीररीत्या चिरडले होते.

ओसीडब्ल्यूच्या कामावर पालकमंत्री नाराज
टँकरचा अपघात : गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
नागपूर : मागील दोन महिन्यांपूर्वी पाणी पुरवठा करणाऱ्या टॅँकर चालकाने हेमंत बंगाले (वय २० वर्षे) या तरुणाला गंभीररीत्या चिरडले होते. मात्र असे असताना या प्रकरणी अजूनपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. शिवाय अपघातग्रस्त तरुणाला कोणतीही मदत मिळाली नाही. यावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओसीडब्ल्यू आणि महानगरपालिका प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करू न पोलिसांना ताबडतोब गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले.
यासंबंधी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या या बैठकीला आमदार सुधाकर कोहळे, नगरसेविका स्वाती आखतकर, अजय बोढारे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या अपघातात हेमंतच्या पोटावरू न टॅँकरचे चाक गेले होते. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला असून, आजही गिल्लूरकर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. विशेष म्हणजे, मंगळवारी झालेल्या बैठकीला हेमंतची आई सुद्धा उपस्थित होती. यावेळी ती म्हणाली, मागील दोन महिन्यांपासून ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी त्यांना खूप हेलपाटे घ्यायला लावले. आधी मदत देतो म्हणून सांगितले, परंतु नंतर ती मदत देण्यास नकार दिला. असेही त्यांनी सांगितले. त्यावर पालकमंत्र्यांनी संबंधित पोलिसांना या प्रकरणी ताबडतोब गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. तसेच अशा पद्घतीने काम सुरू राहणार असेल, तर खपवून घेतले जाणार नाही. असा इशाराही दिला.
त्वरित दवाखान्याचे बिल द्या आणि तासाभरात पुन्हा टॅँकरने पाणी पुरवठा सुरू करण्याचे आदेशही यावेळी पालकमंत्र्यांनी दिले. दुसरीकडे ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी आजच अपघातग्रस्त तरुणाला मदतीचा धनादेश देण्याचे आश्वासन दिले. विशेष म्हणजे, अपघातानंतर या भागातील नागरिकांनी ओसीडब्ल्यूच्या टँकरचालकाविरूद्ध तक्रारी केल्या होत्या. तसेच गेल्या काही दिवसांपासून नरसाळा गावात आंदोलन सुरू होते. टॅँकरचालक पाणी पुरवठ्यासाठी प्रत्येक महिलेकडे २० रुपयांची मागणी करतात, तसेच पैसे दिले नाही, तर पाणी पुरवठा केला जात नसल्याचे तक्रारीत नमूद केले होते. या संदर्भात मनपाचे कोणतेही नियंत्रण दिसून येत नसल्याने मनपाचे कार्यकारी अभियंता संजय गायकवाड यांच्यावर पालकमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ओसीडब्ल्यूचे टँकरचालक प्रशिक्षित नाहीत, अशीही यावेळी नागरिकांनी तक्रार केली. (प्रतिनिधी)