तरुणांमध्ये वाढतेय पोर्नाेग्राफीचे व्यसन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2016 02:15 IST2016-08-28T02:15:12+5:302016-08-28T02:15:12+5:30
महाविद्यालयीन तरुणांमधील अतिरिक्त लैंगिकता ही केवळ आपल्या देशातील नव्हे तर जगभरातील समाजासमोरची समस्या आहे.

तरुणांमध्ये वाढतेय पोर्नाेग्राफीचे व्यसन
स्टीफॅनी ब्युलर : ‘सेक्सालॉजी’राष्ट्रीय परिषदेचा दुसरा दिवस
नागपूर : महाविद्यालयीन तरुणांमधील अतिरिक्त लैंगिकता ही केवळ आपल्या देशातील नव्हे तर जगभरातील समाजासमोरची समस्या आहे.
संस्कृतीच्या ओझ्याखाली भारतीय समाज आहे, तसाच अतिरिक्त व्यक्ती स्वातंत्र्याच्या भाराखाली अमेरिकन समाज आहे. अमेरिकन तरुणांमध्ये पोर्नोग्राफी ही व्यसनाधीनता म्हणून समोर आली असताना आता अनियंत्रित लैंगिक वर्तन हे सामजिक विकृती म्हणून उदयाला येत असल्याचे मत अमेरिकेच्या मानसोपचार तज्ज्ञ डॉ. स्टिफॅनी ब्युलर यांनी व्यक्त केले.
कौन्सिल आॅफ सेक्स एज्युकेशन अॅण्ड पॅरेंटहूड इंटरनॅशनलच्यावतीने शुक्रवारपासून तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. (प्रतिनिधी)
पोर्नाेग्राफीमुळे घटते क्रयशक्ती
डॉ. ब्युलर म्हणाल्या, अमेरिकेतील अतिरिक्त व्यक्ती स्वातंत्र्यामुळे अमेरिकन महाविद्यालयीन तरुण हा पोर्नोग्राफीकडे वळत आहेत. या माध्यमामुळे तरुणांमधली क्रयशक्ती घटते. इंटरनेटवरील हजारो साईट्स तरुणांना गुंतवून ठेवतात. मनामध्ये सतत लैंगिकतेचे विचार सुरू असतात. मेंदूत रासायनिक प्रक्रिया घडत असल्याने काही पोषक तत्त्वांचा अभाव निर्माण होतो.
सतत लैंगिकतेचा विचार केल्याने नैराश्य येते
सतत लैंगिकतेचा विचार केल्याने नैराश्य येते. तणाव वाढतो. चिंता निर्माण होऊन एकाग्रतेचा भंग होतो. करिअर सोडून भलत्याच गोष्टींचा विचार सुरू असतो. याचा परिणाम, बहुतांश देशांतील तरुणाईवर होत आहे. ते कौशल्य गमावून बसण्याच्या उंबरठ्यावर आहेत. एकापेक्षा अधिक व्यक्तींशी संबंध ठेवणे, जोडीदाराशिवाय परक्या व्यक्तीशी संबंध ठेवण्याची इच्छा होणे, याचे प्रमाणही तरुणांमध्ये वाढत असल्याचेही त्या म्हणाल्या.