गटबाजी व खंडणीबाजी चालणार नाही
By Admin | Updated: November 7, 2015 03:22 IST2015-11-07T03:22:51+5:302015-11-07T03:22:51+5:30
शिवसेना हा लोकांच्या मदतीसाठी धावून जाणारा, त्यांना न्याय देणारा पक्ष आहे अशी प्रतिमा सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाली पाहिजे.

गटबाजी व खंडणीबाजी चालणार नाही
अनिल परब यांनी उपटले कान : शिवसेना पदाधिकारी व कार्यक र्त्यांचा मेळावा
नागपूर : शिवसेना हा लोकांच्या मदतीसाठी धावून जाणारा, त्यांना न्याय देणारा पक्ष आहे अशी प्रतिमा सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाली पाहिजे. लोकोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून शिवसेना घराघरांत पोहचवा. पक्षात गटबाजी व खंडणीबाजी चालणार नाही, असा इशारा शिवसेनेचे नागपूर शहर संपर्क प्रमुख अॅड. आमदार अनिल परब यांनी शुक्रवारी दिला.
शिवसेनेचे आक्रमक नेते म्हणून ओळख असलेले अनिल परब यांनी नागपूर शहराच्या संपर्क प्रमुख पदाची सूत्रे हाती घेतली आहे. त्यांच्या उपस्थितीत प्रथमच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यक र्त्यांचा मेळावा शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला. परब कोणती भूमिका मांडतात याची कार्यकर्त्यांना उत्सुकता होती. यावेळी नागपूर शहर जिल्हा प्रमुख सतीश हरडे, किरण पांडव,मंगेश काशीकर, सूरज गोजे, किशोर कुमेरिया, ओमप्रकाश पारवे, राजेश कनोजिया, बंडू तळवेकर, रामचरण दुबे आदी उपस्थित होते.
संघटनेत घटनात्मक पदेच अधिकृत आहेत. घटनाबाह्य कोणतेही पद खपवून घेणार नाही. आपसात न लढता समाजात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची चांगल्या कामासाठी ओळख निर्माण झाली पाहिजे. संघटनेत शाखा प्रमुख हे महत्त्वाचे पद आहे. पक्षात मतभेद असले तरी पक्षाचा आदेश हा सर्वांना मानावाच लागेल. यात कोणत्याही स्वरूपाची तडजोड नाही. मला प्रामाणिक व लढणारे कार्यकर्ते हवे आहे. चांगले काम असेल तर निवडणुकीत उमेदवारी मिळेल. कुणाचाही वशिला वा दबाव राजकारण खपवून घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. नागपूर शहरात विधानसभा मतदार संघानिहाय पक्षाची बांधणी करण्यात येणार आहे. यासाठी पक्षाने सोपविलेली जबाबदारी कार्यक र्त्यांना पार पाडावीच लागेल. सोबतच पदाधिकारी व कार्यक र्त्यांनी जनसंपर्क वाढवावा. यासाठी रक्तदान व अन्य सामाजिक उपक्रम हाती घ्यावे. लोकांचा विश्वास संपादन करावा. यासाठी सर्व शिवसैनिकांनी एकजुटीने कामाला लागावे, असे आवाहन परब यांनी केले.
वर्षभराने नागपूर महापालिकेची निवडणूक असल्याने परब काय आदेश देतात याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले होते. या वेळी राजेश कनोजिया, चिंटू महाराज, विशाल बरबटे, हितेश यादव, प्रतीक बालपांडे, राहुल हरडे, आशीष मनपिया, सुरेखा खोब्रागडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)