उकाड्याने त्रस्त प्रवाशांना मिळतोय गारवा
By Admin | Updated: March 21, 2017 02:08 IST2017-03-21T02:08:14+5:302017-03-21T02:08:14+5:30
उन्हाळ््याच्या दिवसात नागपूरचे तापमान ४८ अंश सेल्सियसपर्यंत जाते. दिवसा रस्त्यावर स्मशान शांतता पसरते.

उकाड्याने त्रस्त प्रवाशांना मिळतोय गारवा
‘मिस्ट कूलिंग सिस्टिम’ ची चाचणी : रेल्वेस्थानकावर यंत्रणा
नागपूर : उन्हाळ््याच्या दिवसात नागपूरचे तापमान ४८ अंश सेल्सियसपर्यंत जाते. दिवसा रस्त्यावर स्मशान शांतता पसरते. अशा स्थितीत बाहेरगावी जाण्यासाठी नागपूर रेल्वेस्थानकावर येणाऱ्या प्रवाशांना या उकाड्यातून दिलासा देण्यासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर रेल्वेस्थानकावर ‘मिस्ट कूलिंग सिस्टिम’ सुरू करण्यात आली असून शनिवारी आणि सोमवारी दिवसभर या यंत्रणेची चाचणी घेण्यात आली.
नागपुरात उन्हाळ््यातील उकाड्यामुळे नागरिक त्रस्त होतात. दिवसभर सहसा कुणीच घराबाहेर पडत नाही. अशा स्थितीत भर उन्हात प्रवासाला निघण्याची वेळ आली की अनेकांपुढे प्रश्न निर्माण होतो. डोक्याला रुमाल बांधून ते कसेबसे रेल्वेस्थानकावर पोहोचतात. अशा प्रवाशांसाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने ‘मिस्ट कूलिंग सिस्टिम’ चा शुभारंभ केला आहे. पहिल्या टप्प्यात प्लॅटफार्म क्रमांक १ वर इटारसी एण्डकडील फूट ओव्हरब्रीज ते आरपीएफ ठाण्याच्या शेजारील फूट ओव्हरब्रीज आणि जनरल वेटिंग हॉलमध्ये ही यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. शनिवारी आणि सोमवारी दिवसभर या यंत्रणेची चाचणी घेण्यात आली.
रेल्वेस्थानकावर असलेल्या शेडच्या खाली एका पाईपमधून थंड पाण्याचे फवारे उडतात. हे पाणी भर उन्हातून आलेल्या प्रवाशांच्या अंगावर पडल्यास त्यांना मोठा दिलासा मिळतो. दुसऱ्या टप्प्यात प्लॅटफार्म क्रमांक २ आणि ३ वर ही यंत्रणा उभारण्यात येणार आहे.
त्यासाठी १२ लाखांचा खर्च आणि दिवसाकाठी चार हजार लिटर पाणी लागणार असल्याची माहिती नागपूर विभागाचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांनी बोलताना दिली. (प्रतिनिधी)