वृक्षवेली हिरवे हिरवे, चिमण्यांचा किलबिलाट चोहीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 08:51 PM2020-04-01T20:51:01+5:302020-04-01T20:51:22+5:30

कोरोना नावाच्या या अतिसुक्ष्म दैत्याने मानवाला निसर्गाकडे बघण्याचा आदेशच जणू दिला आहे. गेल्या ११-१२ दिवसापासून कोरानामुळे मानवाला भोगाव्या लागत असलेल्या ‘लॉकडाऊन’चा अतिशय सुरेख परिणाम निसर्गावर झालेला दिसायला लागला आहे.

Green world and songs of sparrows | वृक्षवेली हिरवे हिरवे, चिमण्यांचा किलबिलाट चोहीकडे

वृक्षवेली हिरवे हिरवे, चिमण्यांचा किलबिलाट चोहीकडे

googlenewsNext
ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे दिसताहेत निसर्गाच्या अद्भूत छटा

प्रवीण खापरे /
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘‘ऐसे गजबले रस्ते, गर्दीच गर्दी चोहीकडे,
ध्वनी-धुळीच्या मापदंडात, वृक्षवेली-पशूपक्षी सारेच काळवंडले!’’... अशी स्थिती ऐरवी सर्वत्र दिसून येते. कुणालाच कुणाची फिकीर नाही. प्रत्येकच जण आपल्याच गरजांच्या व्यस्ततेत गुंतलेले असतात. शहरात असणाऱ्यांना आपल्यासारख्या दिसणाऱ्या मानवाकडे लक्ष द्यावेसे वाटत नाही तेथे वृक्षवेली-पशूपक्षी यांच्या अस्तित्त्वाचे काय देणे-घेणे असणार! माणूस जन्मला काय की मेला काय, आपल्याशिवाय आपल्या गरजांशिवाय निसर्गही आहे, याचे भान त्याला मुळीच नाही. त्याला भानावर आणण्याची किमया एका दूष्ट दैत्याने केली. कोरोना नावाच्या या अतिसुक्ष्म दैत्याने मानवाला निसर्गाकडे बघण्याचा आदेशच जणू दिला आहे. गेल्या ११-१२ दिवसापासून कोरानामुळे मानवाला भोगाव्या लागत असलेल्या ‘लॉकडाऊन’चा अतिशय सुरेख परिणाम निसर्गावर झालेला दिसायला लागला आहे.
ऐरवी रस्ते गजबजलेले असतात. गाड्यांचा आवाज, हॉर्नचे कर्णकर्कश स्वर, सायलेन्सरमधून निघणारा काळाशार धूरात सगळेच माखलेले असतात. दिवसभर राबराबून घरी गेल्यावर मनुष्य स्वत:ला स्नान घालतो आणि मळ दूर करतो. घरात निवांत बसून दिवसभराचा गोंगाट शमवण्याचा प्रयत्न करतो. मात्र, पशू-पक्ष्यांना शहरात मानवासारखी ही सुविधा नाही. पाणी नाही, जंगल नसल्याने त्यांना स्वत:चे घर नाही. वृक्षवेलींचेही तसेच. शहरात अधामधात कुठेतरी उगवलेल्या या वृक्षांना महिनोनमहिने तोच गोंगाट सतत सहन करावा लागतो तर प्रदुषणाच्या धुराचे आवरण पानफुलांवर आच्छादलेले असतात. ही धूळ स्वच्छ करण्यासाठी या वृक्षवेलींना पावसाची चातकासारखी प्रतिक्षाच करावी लागते. मात्र, कोरोनामुळे मानवाला भोगाव्या लागत असलेल्या लॉकडाऊनने वृक्षवेली-पशूपक्ष्यांना जणू संजीवनीच दिली आहे. माणसाने स्वत:ला कोंडून घेतले आहे. माणूस घरात दडपून बसल्याने गाड्या रस्त्यावर उतरत नाही आणि म्हणून निसर्गाला मोकळा श्वास घेता येत आहे. रस्त्यांवरील निरव शांततेने गोंगाड कधीचा पळाला आहे. शहर स्वच्छ असल्याचे दिसायला लागले आहे. जणू शांघाय, सिंगापूर नागपुरातच अवतरले आहे, असे सौंदर्य शहराचे दिसायला लागले आहे. वृक्षांची पानेफुले प्रदुषणमुक्तीचा आस्वाद घेत आहेत. ऐरवी प्रदुषणामुळे वृक्षवेलींची हिरवी पानेही डांबरासारखी भासत होती. आता मात्र ती स्वत:च्या अस्सल हिरव्याकंच रंगात रंगलेली आहेत. वृक्षवेलींच्या याच पाना-फुलांवर हुंदडणाºया पक्षांना प्रदुषण ओसरल्याने शुद्ध भोजन आणि रसग्रहण करता येत आहे. पक्षीच नव्हे तर मधूमक्षीकेसारख्या छोट्या किटकांनाही शुद्धतेचा आस्वाद घेता येत आहे. त्यामुळे कदाचित या काळात निर्माण झालेले मधही अतिशय शुद्ध असेल. चिमण्यांच्या चिवचिवाटाचे तरंग वातावरणात उसळी मारत आहेत आणि इतका स्वच्छ स्वर शहरी माणूस प्रथमच ऐतक आहे. प्रदुषणमुक्तीमुळे निरभ्र झालेल्या आकाशात पांढºया शुभ्र ढगांना छेद देत संध्याकाळी आपल्या घरट्यांकडे परतणारे पक्षांचे थवे आल्हाद देत आहेत. कुत्री, गार्इंचे घोळक्यांच्या असण्याचा वेगळाचा आभास मानवाला घेता येत आहे. पुस्तकांच्या पानात वाचलेल्या कोकीळेचा आवाज प्रत्येकाच्या कर्ण इंद्रियेतून हृदयातचा ठाव घेत आहे. ‘कुहू कुहू’ हा कोकीळ स्वर कधी कुणी ऐकलाय का? नसेल ऐकला तर तो या काळात कर्णपटलांवर पडत असल्याचा अनुभव घेता येतो. इवलीशी खारूताई बघता येत आहे. रस्ते निरव असल्याने रस्त्याच्या कडेने असलेल्या वृक्षांच्या सावलीत ती निवांत दाणा खुडताना दिसत आहे. एकूणच.. कोरोना नावाची महामारी संपूर्ण मनुष्य समाजाला घातक ठरत असली तरी त्या भयाने मनुष्याला निसर्गाच्या जवळ नेले आहे.
‘‘नाही गजबजलेले रस्ते, निरव शांतता सगळीकडे
गोंगाट नाही-धुळ नाही, आल्हाद अवतरले चोहीकडे’’... निसर्गाची ही रया कायम ठेवण्यासाठी, कोरोना प्रकरणातून माणूस धडे घेईल का, असा प्रश्न आता उपस्थित व्हायला लागला आहे.

 

Web Title: Green world and songs of sparrows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.