आजार विकणारे उपाहारगृह, हॉटेल्सवर कारवाईचा बडगा
By Admin | Updated: August 7, 2014 22:49 IST2014-08-07T21:42:08+5:302014-08-07T22:49:48+5:30
सहा उपाहारगृहांना ठोक ले सील, दहा उपाहारगृहांना नोटीस

आजार विकणारे उपाहारगृह, हॉटेल्सवर कारवाईचा बडगा
अकोला : अस्वच्छ स्वयंपाकगृहामध्ये तयार करण्यात आलेले खाद्य पदार्थ विक्री करून शहरातील नागरिकांना आजार वाटणार्या हॉटेल्स व उपाहारगृहांवर महानगरपालिका, अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा बडगा उभारला आहे. लोकमतने स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून खाद्य पदार्था बनविणार्या जागा किती अस्वच्छ आणि तयार करणार्यांकडून किती निष्काळजीपणा होतो हे वास्तव बुधवारी उजेडात आणले होते. त्याची दखल घेत मनपाने बुधवारी सकाळीच कारवाईला सुरुवात करीत शहरातील नामवंत ६ उपाहारगृह, हॉटेल्स व भोजनालयांना सील लावले. मनपासोबतच अन्न व औषध प्रशासन विभागानेही दहा उपाहागृहांना नोटीस दिली तर चार उपाहारगृहांना दंड ठोठावला. अकोला शहराच्या इतिहासात प्रथमच दोन्ही प्रशासकीय यंत्रणांनी संयुक्तपणे राबवलेली कारवाई अकोलेकरांच्या उत्सुकतेचा विषय ठरली. शहरात उपाहारगृह, हॉटेल्स व भोजनालयांचा मोठा व्यवसाय आहे. या व्यवसायातून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. अकोलेकरांच्या खिशातून वसूल केल्या जाणार्या पैशांच्या मोबदल्यात त्यांना खाद्य पदार्थांसोबत नानाविध आजारांचीही विक्री हॉटेल व उपाहारगृह व्यावसायिकांकडून होत असल्याचे ह्यलोकमतह्णने उघडकीस आणले. शहरातील अनेक प्रतिष्ठित व नामवंत हॉटेल्स, उपाहारगृह तसेच भोजनालयांमधील स्वयंपाकगृह (किचन) अतिशय अस्वच्छ व किळसवाणे असल्याचे लोकमत चमूने केलेल्या पाहणीत दिसून आले. अस्वच्छ भांडे, दूषित पाणी, निकृष्ट धान्या वापरून खाद्यपदार्थ विक्री करताना स्वच्छतेचे सर्व निकष सर्रासपणे पायदळी तुडविल्या जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर येताच, मनपा प्रशासनाने बुधवारी सकाळीच धडक मोहिम सुरू केली. प्रभारी आयुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्या आदेशानुसार आरोग्य व स्वच्छता विभागाने नामवंत सहा उपाहारगृह-भोजनालयांना सील लावले. यामध्ये प्रामुख्याने मध्यवर्ती बस स्थानकावरील पारिका यांचे ह्यकॅन्टीनह्ण, झुणका भाकर केंद्र, रेल्वे स्थानक चौकातील आनंद भोजनालय, गुजराती स्विटमार्ट तसेच सिंधी कॅम्पस्थित बालाजी स्वीटमार्टचा समावेश आहे. या कारवाईत अन्न व औषध प्रशासन विभागाने सुद्धा उडी घेत, शहरासह ग्रामीण भागातील दहा उपाहारगृहांना नोटीस जारी केल्या तसेच चार उपाहारगृहांना दंड ठोठावला. दोन्ही प्रशासकीय यंत्रणांनी एकाच दिवशी धडक मोहीम राबवल्याने खाद्य पदार्थांची विक्री करणार्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.