वनविभागामुळे रखडला विकास

By Admin | Updated: February 16, 2015 02:22 IST2015-02-16T02:22:33+5:302015-02-16T02:22:33+5:30

इंग्रजांच्या काळात वनांचे राखीव, संरक्षित व झुडपी असे वर्गीकरण करण्यात आले. तेव्हा संरक्षित आणि झुडपी जंगलावर लोकांचा अधिकार होता.

Grasshopper development due to forest division | वनविभागामुळे रखडला विकास

वनविभागामुळे रखडला विकास

नागपूर : इंग्रजांच्या काळात वनांचे राखीव, संरक्षित व झुडपी असे वर्गीकरण करण्यात आले. तेव्हा संरक्षित आणि झुडपी जंगलावर लोकांचा अधिकार होता. मात्र १९८० मध्ये नवीन वनकायदा आला, तेव्हा वनांवरील लोकांचा अधिकार काढून घेण्यात आला. १०० टक्के जंगल हे वनविभागाच्या अखत्यारीत आले. वनखात्यामुळे विदर्भातील ९० टक्के सिंचनाचे प्रकल्प रखडले. सर्वाधिक खनिज संपदा असतानाही एकही उद्योग निर्माण होऊ शकला नाही. विदर्भाच्या मागासलेपणाला वनविभाग जबाबदार असल्याचा आरोप आमदार शोभा फडणवीस यांनी केला.
जनमंचतर्फे आयोजित जनसंवाद या कार्यक्रमात वेगळा विदर्भ कशासाठी? या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रमुख वक्ता म्हणून शोभा फडणवीस बोलत होत्या. व्याख्यानाला अध्यक्ष म्हणून जनमंचचे सल्लागार प्रा. शरद पाटील, जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर, उपाध्यक्ष प्रमोद पांडे, महासचिव राजीव जगताप उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना शोभा फडणवीस यांनी विदर्भाच्या क्षमतेची माहिती दिली. विदर्भावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली. विदर्भाच्या विकासासाठी वेगळ्या विदर्भाची आवश्यकता पटवून दिली. राज्याच्या पर्यावरणाचा समतोल केवळ १९.९ टक्के जंगलावर आधारित आहे. हे जंगल केवळ विदर्भात आहे. १९८० मध्ये नवीन वनकायदा झाला तेव्हा राज्यात ३१ टक्के जंगल होते. २०१२-१३ मध्ये केवळ २०.२० टक्के जंगल राहिले. २०१३-१४ मध्ये जंगलाचे क्षेत्र १९.९ टक्क्यांवर आले. पुण्यातील लवासा सिटीसाठी अजित पवारांनी विना परवानगीने २० किलोमीटरचे जंगल कापले. विदर्भात जंगलामुळे अडलेल्या प्रकल्पासाठी एक इंचही जंगल कापू दिले नाही. जंगलामुळे विदर्भातील ११ सिंचन प्रकल्पाला मंजूरी मिळू शकली नाही. ऐतिहासिक मालगुजारी तलावाचा वापर जंगलामुळे होऊ शकला नाही.
त्यामुळे विदभाचे कृषी क्षेत्र अविकसित राहिले. विदर्भात १३ टक्के ओलित व ८७ टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे.
येथील शेतकरी निसर्गावर अवलंबून आहे. त्यामुळे विदर्भाला आत्महत्येचा क लंक लागला आहे. गोदावरी तंटा लवादाने विदर्भाच्या वाट्याला हजारो अब्ज घनफूट पाणी उपलब्ध केले. वनविभागामुळे यातून एक थेंबही पाणी विदर्भाला मिळाले नाही. प्रदूषणाचे भूत विदर्भाच्या डोक्यावर आहे. हे सर्व मुद्दे विदर्भाच्या विकासाला मारक ठरले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अ‍ॅड. अनिल किलोर यांनी केले. संचालन राम आकरे व आभार राजीव जगताप यांनी मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Grasshopper development due to forest division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.