आजी-माजी मंत्र्यांची कसोटी

By Admin | Updated: August 30, 2014 02:44 IST2014-08-30T02:44:58+5:302014-08-30T02:44:58+5:30

रोहयो मंत्री नितीन राऊत यांनी गेल्या तीन निवडणुकांमध्ये उत्तर नागपूर सर केले. प्रत्येक निवडणुकीत त्यांचे मताधिक्य कमी होत गेले असले तरी भाजपला ही जागा जिंकता आली नाही.

The grandmother-former ministers' test | आजी-माजी मंत्र्यांची कसोटी

आजी-माजी मंत्र्यांची कसोटी

कमलेश वानखेडे नागपूर
रोहयो मंत्री नितीन राऊत यांनी गेल्या तीन निवडणुकांमध्ये उत्तर नागपूर सर केले. प्रत्येक निवडणुकीत त्यांचे मताधिक्य कमी होत गेले असले तरी भाजपला ही जागा जिंकता आली नाही. लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच उत्तर नागपुरात भाजपला आघाडी मिळाली. ही राऊत यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे. भाजपही येथे तगडा उमेदवार देऊन राऊत यांची कोंडी करण्याच्या बेतात आहे. मात्र, पक्षाने पालकमंत्री पद देऊन त्यांची ताकद वाढविली आहे. आता मतदार या वेळी त्यांचे पालकत्व स्वीकारतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काटोल मतदारसंघातून आजवर चार वेळा अनिल देशमुख विजयी झाले आहेत. पहिल्यांदा अपक्ष व नंतर मात्र त्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ सोडले नाही. त्यांनी पुन्हा काटोलातून तयारी चालविली आहे. त्यांच्या विरोधातील शिवसेनेचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. हसतमुख राहणारे देशमुख राजकीय समीकरणात तरबेज आहेत.
उमरेड मतदारसंघ आरक्षित झाल्यानंतर राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी आपला राजकीय मोर्चा नागपूर शहराकडे वळविला. गेल्या निवडणुकीत त्यांनी पश्चिम नागपूरवर दावा केला होता. मात्र, ऐनवेळी माजी मंत्री अनिस अहमद यांनी दिल्लीहून तिकीट आणले. यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मुळक विजयी झाले. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होताच मुळक यांना राज्यमंत्रीपद मिळाले. आता मुळक यांची विधानसभेत जाण्यासाठी तगमग सुरू आहे. त्यांनी पुन्हा एकदा पश्चिम नागपूरसाठी तयारी चालविली आहे. त्यांना शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या आव्हानाला सामोरे जावे लागत आहे. पश्चिममध्ये मुळक यांना तिकीट मिळणार की नाही, या विषयावर राजकीय वर्तुळात शर्यती लागत आहेत.
माजी मंत्री सतीश चतुर्वेदी व माजी मंत्री अहमद यांनी पुन्हा एकदा सज्ज आहेत. गेल्या निवडणुकीत चतुर्वेदी यांचा पूर्व नागपुरातून दारुण पराभव झाला होता. तर अहमद यांनाही थोड्या फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले होते. लोकसभा निवडणुकीत पूर्वमध्ये चतुर्वेदींच्या पराभवाची लीड दुपटीहून अधिक झाली. पश्चिमध्येही ४० हजाराने भाजपने मुसंडी घेतली. हे चित्र पाहता चतुर्वेदी हे निवडणूक लढायची की नाही, अशा द्विधा मन:स्थितीत होते. मात्र, अलिकडच्या काळात त्यांनी घेतलेल्या बैठका पाहता ते पुन्हा एकदा ताकद आजमावतील, असे दिसते. अनिस अहमद यांनी आपला मोर्चा जुना मतदारसंघ असलेल्या मध्य नागपूरकडे वळविला आहे. मुस्लीम मतदारांचे प्राबल्य असलेल्या मतदारसंघात स्थिरावण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. कळमेश्वर विधानसभा मतदारसंघ व पुनर्रचनेनंतरच्या हिंगणा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे माजी मंत्री रमेश बंग हे गेल्यावेळी थोड्या फरकाने हरले. पहिल्यांदा येथे भाजपचे कमळ फुलले. तेव्हापासून बंग कामाला लागले आहेत. राजकीय पुनर्वसनासाठी ही निवडणूक त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते गेल्यावेळी काँग्रेसच्या तिकिटावर रामटेकमधून पराभूत झाले. या वेळी पुन्हा एकदा ते रामटेकच्या तिकिटासाठी आग्रही आहेत.

Web Title: The grandmother-former ministers' test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.