ग्रामीण जनता यंदाही पाण्यासाठी तडफडणार
By Admin | Updated: March 15, 2017 02:27 IST2017-03-15T02:27:22+5:302017-03-15T02:27:22+5:30
दरवर्षी उन्हाळ्यात ग्रामीण भागातील जनतेला पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते.

ग्रामीण जनता यंदाही पाण्यासाठी तडफडणार
टंचाई नियोजनाकडे प्रशासन, पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : जिल्ह्यातील १२३५ गावांवर टंचाईचे सावट
नागपूर : दरवर्षी उन्हाळ्यात ग्रामीण भागातील जनतेला पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते. त्यामुळे टंचाई निवारण्याच्या कामाचे नियोजन उन्हाळा सुरू होण्यापूर्वी झाल्यास, त्याची झळ ग्रामीण जनतेला फारशी पोहचत नाही. यंदा जिल्ह्यातील १२३५ गावांवर टंचाईचे सावट असल्याचे वर्तविण्यात येत आहे. टंचाई निवारण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी २६ कोटी ६५ लाख ६९ हजार रुपयांच्या कृती आराखड्याला मंजुरी दिली आहे. टंचाईचे पुढचे नियोजन जि.प. ला करायचे आहे. त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने यंदाही ग्रामीण जनता पाण्यासाठी तडफणार असल्याचे चित्र आहे.
उन्हाळ्याची झळ लागायला सुरुवात झाली आहे. दरवर्षी जि. प. प्रशासन पाणीटंचाई निर्मूलनार्थ उपाययोजना करते. मात्र या उपाययोजना कागदावरून पुढे सरकल्या नसल्याचे समोर आले आहे़ जिल्हाधिकाऱ्यांनी २६ कोटी ६५ लाख ६९ हजार रुपयांच्या कृती आराखड्याला मंजुरी दिल्यानंतरही जि. प. कडून तातडीने उपाययोजना करण्यात आल्या नाही़ साहायक भूवैज्ञानिक विभागाकडून विंधन विहिरी आणि विहिरी कुठे खोदायच्या, याचे सर्व्हेक्षणच पूर्ण झाले नाही़ त्यांच्या आराखड्यावरच पुढील उपाययोजनांची अंमलबजावणी शक्य असते़ परंतू जि. प. ने हा अहवाल तातडीने देण्यासाठी पाठपुरावाच केला नसल्याची माहिती आहे़ सध्या पाणीटंचाई कृती आराखड्याचा दुसरा आणि तिसरा टप्पा सुरू आहे़ दुसऱ्या टप्प्याचा कालावधी समाप्त व्हायला केवळ दोन आठवडे शिल्लक आहे़ जि. प. च्या पाणीपुरवठा विभागाची अद्यापही पाणीप्रश्नावर बैठकही झाली नाही़ मार्च महिन्यात ८९५ गावांत पाणीटंचाई सुरू झाली आहे. तर एप्रिल ते जूनच्या कालावधीत ३४० गावे टंचाईच्या वर्गवारीत येणार आहे़ परंतु मार्च महिन्यातील उपाययोजना वेळेवर न झाल्यास हा आकडा वाढण्याची शक्यता आहे़ यामध्ये नळ योजना, विशेष दुरुस्ती, विंधन विहिरी, विशेष विंधन विहिरी दुरुस्ती, तात्पुरती नळ योजना, विहीर खोलीकरण, बुडक्या खोदणे, टँकरव्दारे पुरविणे, खासगी विहीर अधिग्रहण, आदी उपाययोजनांचा समावेश आहे़ दुसरीकडे पाणीटंचाई प्रशासन कधी सोडवेल, या मागणीचा अर्जांचा ढीग जि. प. च्या पाणीपुरवठा विभागाच्या दप्तरी लागला आहे़
ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष गव्हाणकर यांची उचलबांगडी नागपूर जीवन प्राधिकरणला करण्यात आली़ प्रभार लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता अजय सहारे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. दोन्ही विभागाचा प्रभार सांभाळताना त्यांची तारेवरची कसरत होत आहे़ त्याचाच फटका पाणीटंचाई कृती आराखड्यालाही बसला आहे़ (प्रतिनिधी)
तहान लागल्यावर विहीर खोदणार का?
येणाऱ्या काळात भीषण पाणी टंचाईचा सामना ग्रामीण जनतेला करावा लागणार आहे. परंतु अद्यापही जि.प. टंचाई संदर्भात एकही बैठक झालेली नाही. जिल्ह्यात दरवर्षी भेडसावणारी पाणी टंचाई लक्षात घेता जि.प. टंचाईवर विशेष सभा बोलाविणे गरजेचे आहे. परंतु यासंदर्भात कुठलेही गांभीर्य दिसून येत नाही. ऐन उन्हाळ्यात तहान लागल्यावर विहीर खोदणार का, असा सवाल जि.प. सदस्य नाना कंभाले यांनी केला आहे.