ग्रामपंचायतीत एलसीडीवर मिळणार आवश्यक माहिती

By Admin | Updated: May 31, 2015 02:44 IST2015-05-31T02:44:55+5:302015-05-31T02:44:55+5:30

राज्यातील भौगोलिक व नैसर्गिक साधनसंपत्तीच्या उपलब्धतेची माहिती सूदूर संवेदन तंत्रज्ञानाच्या उपयोगाने उपग्रहामार्फत संकलित करून

Gram Panchayat will get the necessary information on the LCD | ग्रामपंचायतीत एलसीडीवर मिळणार आवश्यक माहिती

ग्रामपंचायतीत एलसीडीवर मिळणार आवश्यक माहिती

देवेंद्र फडणवीस : डिजिटल डाटाबेस प्रणालीचे सादरीकरण
नागपूर : राज्यातील भौगोलिक व नैसर्गिक साधनसंपत्तीच्या उपलब्धतेची माहिती सूदूर संवेदन तंत्रज्ञानाच्या उपयोगाने उपग्रहामार्फत संकलित करून ती महावन डिजिटल डाटाबेस प्रणालीव्दारे सर्व ग्रामपंचायतीत एलसीडीच्या स्क्रीनवर मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली. व्हीएनआयटी परिसरातील महाराष्ट्र सूदूर संवेदन उपाययोजना केंद्राच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
सूदूर संवेदन तंत्रज्ञानाच्या उपयोगाने सॅटेलाईटच्या माध्यमातून माहिती संकलन व त्याचा प्रभावी वापर यासाठी महावन डिजिटल डाटाबेस कार्यक्रमाच्या अंमलबजवणी संदर्भात मुख्यमंत्र्यांना सादरीकरणाव्दारे माहिती देण्यात आली. अर्थ व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, पोलीस आयुक्त एस.पी.यादव, वनविभागाचे प्रधान मुख्यवन संरक्षक एस.के.झा. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, सूदूर संवेदन उपयोजन केंद्राचे संचालक डॉ. सुभ्रतो दास आदी उपस्थित होते.
सूदूर संवेदन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राज्यातील भौगोलिक तसेच नैसर्गिक साधनसंपत्तीच्या माहिती संकलनासोबतच उपग्रहामार्फत पर्यावरण, शेतीसाठी आवश्यक असणारे पर्जन्यमान, पिकांची माहिती, कृषी विषयक माहिती संकलित करून ग्रामपंचायत कार्यालयात एलसीडीच्या माध्यमातून दिल्यास शेतीचे नियोजन करणे सोयीचे होईल , असे त्यांनी सांगितले.
सॅटेलाईटव्दारे प्राप्त होणारी माहिती विश्लेषणाबरोबर शेतीविषयक तसेच नैसर्गिक आपत्तीत झालेल्या नुकसानीसंदर्भात अचूकपणे माहिती संकलित होईल. त्या दृष्टीने प्रणाली विकसित क रण्याची सूचना केली.
या प्रणालीमुळे राज्यातील प्रत्येक गावांचे डिजिटल नकासे तयार करणे, जलयुक्त शिवार योजनेत सुरू असलेल्या कामांची माहिती, टंचाईग्रस्त गावात करण्यात आलेल्या उपाययोजना याची माहिती उपलब्ध होणार आहे.
या प्रकल्पासाठी २०० कोटी प्रस्तावित आहे. महावन डिजिटल डाटाबेस या प्रणालीसाठी लागणारा खर्च नियोजन विभागाने शासनाकडे सादर करावा, अशी सूचनाही त्यांनी केली.
डॉ. सुभ्रतो दास यांनी प्रकल्पाची माहिती दिली. केंद्राचे संशोधक विवेकानंद घारे, दिलीप कोलते, संजय पाटील , आनंद खोब्रागडे, सतीश कोल्हारकर आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)

Web Title: Gram Panchayat will get the necessary information on the LCD

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.