ग्रेस सर.. आय विल नेव्हर फर्गेट यू

By Admin | Updated: March 26, 2015 02:29 IST2015-03-26T02:29:51+5:302015-03-26T02:29:51+5:30

तो कलंदर कवी होता म्हणावे तर तो जीवनाच्या अत्यंत खोल बाजूंना स्पर्श करणाराही कवी होता.

Grace Sir .. I'll never forget you | ग्रेस सर.. आय विल नेव्हर फर्गेट यू

ग्रेस सर.. आय विल नेव्हर फर्गेट यू

नागपूर : तो कलंदर कवी होता म्हणावे तर तो जीवनाच्या अत्यंत खोल बाजूंना स्पर्श करणाराही कवी होता. नव्हे जीवनाच्या पलिकडचे चिंतन करणारा होता. कलाकृतींतून प्रगल्भ कलावंत अमूर्ताचा शोध असतो आणि हे अमूर्तही मूर्त स्वरूपात आणण्यासाठी, ते समजून घेण्यासाठी धडपडत असतो. अनंत काळापासून कलेचा हा प्रयत्न सुरू आहे, सुरूच राहणार आहे. हे अमूर्त अनुभवता येत नाही कारण तो विषयच अनुभूतीचा असतो. अनुभूती नेमकी कशी पकडणार, त्यातून नेहमीच खूप काही निसटून जाते. नेमके हेच पकडू पाहणारे ग्रेस सर...शब्दांच्या, कवितेच्या माध्यमातून आपल्यात जिवंत आहेत. कवी ग्रेस यांचा आज स्मृतिदिन. पुन्हा-पुन्हा त्यांच्याच कवितेची पारायणे करीत रसिक त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात पण त्यांच्या कवितेतून काहीतरी समजणे निसटतेच आहे. प्रत्येक वेळी त्यांची कविता एक वेगळा अनुभव देत असते. त्यामुळेच प्रत्येक वेळी नव्याने कळणारी लिहणाऱ्या ग्रेस सरांना विसरता येत नाही.

ग्रेस सर...आय विल नेव्हर फर्गेट यू...!
मानवी जीवनाचा प्रवास तसा फार थोडा काळ आहे. त्यानंतरचे जीवन हा मोठा पल्ला आहे, असेच आपले धर्मशास्त्र, तत्त्वज्ञान आणि संस्कृती सांगते. मानवी अस्तित्वाचा संघर्ष, वेदना, दु:ख आणि त्याची मांडणी असणारी कविता खचितच मोठी असते कारण ती मानवी जगण्याचे संदर्भ घेऊन येते. पण ग्रेसांची कविता आत्मशोधाचा आकांत होती. त्यामुळे त्यांच्या उपमा- प्रतिमा त्यांच्या कवितेत वेगवेगळे संदर्भ घेऊन येत होत्या. ग्रेस सरांची कविता म्हणजे लाटेवर तरंगणारे दिवे. ज्याने ओंजळ पसरली त्याच्या ओंजळीत येणारे. शब्द कविचे पण अनुभव ज्याचा त्याचा असतो. प्रत्येकाला ग्रेसांची कविता वेगवेगळी भावते आणि प्रत्येक माणसानुरूप त्याचे अर्थही वेगवेगळे निघतात. ग्रेस सरांना नेहमीच दु:खाने साद घातली कारण तेच शाश्वत आहे. पण ग्रेस सरांना अपेक्षित असणारे दु:ख अनाकलनीय होते. सामान्य माणसांच्या आणि प्रतिभावंतांच्याही वाट्याला हे दु:ख येत नाही. त्यासाठी भावनांची फारच समृद्धता आणि तयारी लागते. ती प्रत्येकाजवळ असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही त्यामुळेच आजही ग्रेस सरांची कविता उमगत नाही पण आवडते. त्यांच्या कवितांचे अर्थ शोधण्याचा प्रवास रसिकांनाही नकळतपणे समृद्ध करीत जातो आणि आयुष्याचा अर्थ सांगतो.
ग्रेस सरांना संतकवी म्हणणारेही अनेक आहेत. कायम एका स्वतंत्र बेटावर आपल्या कलाकृती निर्माण करणाऱ्या ग्रेस सरांना त्यांचा हा अवकाश गरजेचा होता. ग्रेस सरांनी मानवी संघर्षाची, मानवी दु:खाची कविता लिहिली नाही, असा आरोप काही समीक्षक करतात पण त्यात फारसे तथ्य नाही. मानवी अस्तित्वाचे मूळ शोधण्याचाच तर त्यांचा प्रयत्न त्यांच्या कवितेत आहे. त्यांचे दु:ख प्राचीन, आदिम आणि शाश्वत आहे. या शाश्वत दु:खावर उपाय नाही. त्यामुळेच ग्रेस सरांची भीती अनामिक आहे. जीवनाच्या पल्याड असणारे अस्तित्व शोधण्याचा हा प्रयत्न अध्यात्मानेही केला, ग्रेस सरांनी तो कवितेच्या माध्यमातून केला. हा शोध अनंत आहे...हा अनंतच राहणार. कदाचित या बाजूने ग्रेस सरांची कविता हळुवार उकलते, काहींच्या हाती सापडत जाते आणि त्यानंतर ग्रेस काय म्हणतात, ते जरासे आकलन होते. आमचे जीवन सूक्ष्म भावनांनी समृद्ध करणाऱ्या ग्रेस सरांना विसरता येत नाही कारण ते विस्मृतीत जाऊ शकत नाहीत. नागपुरात दाढी वाढवून स्कूटरवर फिरणारे ग्रेस सर आमच्या आठवणीत आहेत. धंतोलीत अनवाणी पायाने फिरणारे ग्रेसही आमच्या आठवणीत आहेत आणि एखाद्या कार्यक्रमात प्रासादिक वाणीने संमोहित कणाऱ्या ग्रेस सरांची भाषणे आम्ही कानात प्राण आणून ऐकली आहेत. सर....विसरणार कसे...तुम्ही कायम आठवणीत आहात.


ग्रेस सर...
चहा...तसाच आहे...!!

गोविंदा उपरीकर...एक गरीब चहावाला. धरमपेठ चौकात त्याचा चहाचा ठेला. ग्रेस सर रोज पोहायला जायचे आणि येताना त्याच्याकडून चहा प्यायचे. हळूहळू त्याच्याशी ओळख झाली. एम. ए. इंग्रजी असलेल्या गोविंदाची समज चांगली होती. ग्रेस सरांचा त्याच्याशी संवाद वाढला आणि रोजच चर्चा व्हायला लागल्या. एक दिवस ग्रेस सर सारे सोडून निघून गेले. पण गोविंदा पहिला चहा ग्रेस सरांसाठी काढून ठेवतो का? याचे उत्तर त्याच्याही जवळ नाही. आजही हा चहा पहाटे ५ वाजता त्यांच्यासाठी असतो..कुणास ठावून, ग्रेस येत असतील.

Web Title: Grace Sir .. I'll never forget you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.