- तहसील कार्यालयात ईव्हीएम सील
कामठी : कामठी तालुक्यातील भामेवाडा, टेमसना, पावनगाव, कोराडी, घोरपड, लोणखैरी, केसोरी, खेडी, महालगाव ग्रा.पं. च्या निवडणुकीसाठी तालुका प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या ग्रा.पं.च्या ८६ जागांसाठी २३७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या ९ ग्रा.पं.साठी २१ हजार १२५ मतदार १५ जानेवारीला मतदानाचा हक्क बजावतील. यात १० हजार ७७५ पुरुष तर १० हजार ३५० महिला मतदारांचा समावेश आहे. ३६ मतदान केंद्रांवर ही निवडणूक होईल. येथे कंट्रोल युनिट व बेलेट युनिटची संख्या ३६ इतकी आहे. मतदान केंद्राध्यक्ष व मतदान केंद्र अधिकारी असे एकूण २०४ कर्मचारी ही निवडणूक घेतील. प्रत्येक मतदान केंद्रावर १४ जानेवारीला पोलिंग पार्टी रवाना होतील. निवडणुकीच्या दिवशी मतदान यंत्राबाबत कोणत्याही तक्रारी येऊ नयेत यासाठी मंगळवारी तहसील कार्यालयात तहसीलदार अरविंद हिंगे यांच्या मुख्य उपस्थितीत ईव्हीएमची तपासणी करण्यात आली. याप्रसंगी परिविक्षाधीन तहसीलदार जितेंद्र शिकतोडे, परिविक्षाधीन नायब तहसीलदार माळी, नायब तहसीलदार आर.टी. उके, नायब तहसीलदार रणजीत दुसावार, नायब तहसीलदार एस.एन. कावटी, एस. चंद्रिकापुरे यांच्या उमेदवारांचे निवडणूक प्रतिनिधी उपस्थित होते.